‘जनसंपर्कतज्ज्ञ : प्रा. सुरेशजी पुरी लोकपत्रकारिता’ पुरस्काराची घोषणा!

0
13

ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब पहिले मानकरी.
छ. संभाजीनगर, ५ (प्रतिनिधी) – शब्दवेध बुक हाऊस प्रकाशन संस्थेच्या वतीने जनसंपर्क तज्ज्ञ प्रा. सुरेशजी पुरी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त, ‘जनसंपर्कतज्ज्ञ : प्रा. सुरेशजी पुरी लोकपत्रकारिता’ पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. या पुरस्काराचे मानकरी म्हणून ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब, अंबाजोगाई यांची निवड करण्यात आली आहे.
संवेदनशील पालक, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, लोकोपयोगी व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी प्रमुख प्रा. सुरेश पुरी सर हे संबंध देशभरात परिचित आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. तेच विद्यार्थी आणि लाभार्थी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची कृतज्ञता म्हणून शब्दवेध बुक हाऊस या प्रकाशन संस्थेच्या वतीने या वर्षापासून सदर पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे.
ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब हे दैनिक मराठवाडाच्या लातुर आवृत्तीचे संपादक होते. ते शेतकरी संघटनेतील सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी शेतकरी आत्महत्या संदर्भात लेखनासह कृतीशील उपक्रमही राबवले आहेत. त्यांनी सामाजिक चळवळीच्या अनुषंगाने अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.त्यात ‘नाते, कलमा, संवाद, आकलन, शेतकरी विरोधी कायदे’सह दहा पुस्तके त्यांची प्रकाशित झाले आहेत. ‘शेतकरी विरोधी कायदे’ या ग्रंथाचा वेगवेगळ्या भाषेत अनुवादही झाला आहे. ते सध्या आंतरभारती मासिकाचे संपादक आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन अमर हबीब यांची निवड केल्याचे प्रकाशक वैजनाथ वाघमारे यांनी सांगितले.
जनसंपर्क विषय विद्यापीठात शिकविताना प्रा. पुरी सरांनी लोकसंपर्कच अधिक ठेवला. ते कधीच रूबाबदार प्राध्यापक न होता, जबाबदार पालक झाले. त्यामुळे त्यांचे शेकडो विद्यार्थी देशाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असले तरी प्रा. पुरी यांच्याबद्दल अत्यंत कृतज्ञशील आहेत. प्रा. पुरी यांचे ‘जनसंपर्क : संकल्पना आणि सिद्धांत’ हा ग्रंथ खूप लोकप्रिय ठरला. तो विद्यापीठीय विद्यार्थ्यांसह सार्वजनिक जीवनात काम करणार्‍यांसाठी अत्यंत उपयोगी म्हणूनच त्या ग्रंथाकडे पाहिले जाते. हाच ग्रंथ हिंदीतही प्रकाशित झाला असून ‘महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी’चा बाबुराव विष्णू पराडकर पुरस्कारही या ग्रंथाला मिळाला आहे. सन २०१० साली प्रा. पुरी यांच्यावर ज्येष्ठ पत्रकार महारूद्र मंगनाळे यांनी ‘आई मनाचा माणूस’ हा ग्रंथ संपादित केला असून लातुरच्या मुक्तरंग प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आला आहे. या ग्रंथाच्या दोन आवृत्त्या निघाल्या आहेत.
अकरा हजार रुपये रोख रक्कम, मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर कार्यक्रम दिनांक १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता मौलाना आझाद संशोधन केंद्र, मजनु हिल येथे संपन्न होणार आहे. पुरस्काराचे पहिलंच वर्ष असून यापुढेही लोकपत्रकारिता करणार्‍या पत्रकारांचा सन्मान करताना या पुरस्काराचे मूल्य जपण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे वाघमारे यांनी सांगितले.यावेळी पत्रकार परिषदेला प्रभाकर अर्सूड, डॉ. संजय गायकवाड उपस्थित होते.