परभणीत ५ प्रकरणांमध्ये सामंजस्य
परभणी,दि.10 : अतिक्रमणमुक्त पाणंद व शेतरस्ते या विषयांवर शेतकऱ्यांना तात्काळ आणि सोपा न्याय मिळावा यासाठी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी १६ एप्रिल २०२५ रोजी परिपत्रक व २ मे २०२५ रोजी पत्रक जारी करून दर पंधरा दिवसांनी “सस्ती अदालत” आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार तहसील कार्यालय, परभणी येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत “सस्ती अदालत” संपन्न झाली.
या सस्ती अदालतीत उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, व नायब तहसीलदार (महसूल १)मधुकर क्षीरसागर यांच्या उपस्थितीत एकूण ११ प्रकरणांवर सुनावणी झाली. यापैकी ५ प्रकरणे समुपदेशन व सामंजस्याच्या माध्यमातून मार्गी लावण्यात यश आले, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. मात्र, उर्वरित प्रकरणांमध्ये संबंधित पक्षकार अनुपस्थित असल्याने त्यावर तत्काळ कार्यवाही होऊ शकली नाही.
या उर्वरित प्रकरणांची सुनावणी येत्या २३ मे २०२५ रोजी नियोजित सस्ती अदालतीत करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.
सदर अदालतीस मंडळ अधिकारी नंदकिशोर सोनवणे, विकास आगलावे, एन.आर. सोडगीर, संचिन शिंदे, उद्धव सरोदे व ज्योती अढागळे यांची उपस्थिती होती. तसेच एकूण ५७ शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
“सस्ती अदालत” उपक्रमामुळे शेतकऱ्यांना थेट प्रशासनाच्या माध्यमातून न्याय मिळण्याचा मार्ग सुकर झाला असून, यामुळे ग्रामस्तरावरच्या शेतविवादांवर सामंजस्याने तोडगा निघण्याची शक्यता वाढली आहे.