गोंदिया,दि.१०-राष्ट्रीय पातळीवर तयार करण्यात आलेल्या शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षणाची सुविधा गावातच असायला हवी.या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून संबंधित जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र ते वर्ग सुरु करतांना शासन शिक्षक देणार नाही,हे तेवढेच स्पष्ट आहे.सध्याच्या घडीला सेमी इंग्रजी व इंग्रजीमाध्यामाच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांच्या कल असतांना जिल्हा परिषदेच्या शांळामध्ये पाहिजे तसे गणित व विज्ञान विषयाचे शिक्षकच नसतांना जि.प.प्राथ.शाळेत आठवीचे वर्ग सुरु करण्याचा अट्टाहास का?असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेने २०१५-१६पासून जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक शांळामध्ये आठवीचे वर्ग सुरु केले आहे,मात्र त्याठिकाणी विज्ञान व गणिताचे शिक्षकच नाहीत.सोबतच विद्यार्थी सेमी इंग्रजीकडे जाऊ इच्छित असला तरी स्थानिक राजकारण व शाळेत इयत्ता आठवीतील अभ्यासक्रमाच्या दृष्टीकोनातून शिक्षक नसतानाही अनेक शाळा समिती मुख्याध्यापक व शिक्षकासोबत वर्ग सुरु करण्याच्या अट्टाहास करु लागल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे जाणवू लागले आहे.इयत्ता आठवी वर्ग सुरु करणार्या शाळामध्ये बीएस्सी बीएड असलेले गणित व विज्ञान विषयाचे किती शिक्षक त्या शाळेत उपलब्ध आहेत अशी विचारणा केल्यावर मात्र शिक्षण विभाग हात वर करते.उलट शिक्षक आम्ही देणार नाही,या अटीवरच वर्ग सुरु करण्याची परवानगी देत असल्याचे स्पष्ट करुन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळत असल्याचे स्पष्ट झाले आहे,अशा वेळी जोपर्यंत विज्ञान व गणिताचे शिक्षक आठवी वर्ग सुरु करणार्या शाळेत आहेत की नाही,याची खात्री केल्याशिवाय शाळाव्यवस्थापनांनी सुध्दा मुलांच्या भविष्य़ाशी खेळणे कितपत योग्य अशा चर्चांना आता वेग आलेला आहे.
या नव्या निर्णयानुसार आता ज्या गावापासून पाचवी वर्ग असलेली शाळा एक किमीपेक्षा लांब असेल आणि आठवी वर्गाची शाळा तीन किमीपेक्षा दूर असेल, अशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांना हे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्याचा शासनाचा निर्णय आहे.मात्र जर गावात व गावाशेजारीच शाळा असेल तर असे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही असे सुद्धा शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.दरम्यान, हे वर्ग सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर त्या शाळेच्या सुविधांची पडताळणी होणे आवश्यक असते,पण ती पडताळणी न होताच स्थानिक राजकारणातील वर्चस्वाच्या लढाईतच अनेक शांळाना वर्ग सुरु करण्याची परवानगी दिली गेल्याने आज गोंदिया जिल्ह्यातील काही अपवादात्मक शाळा वगळता जिल्हा परिषदेच्या ज्या प्राथमिक शाळामध्ये आठवीचे वर्ग सुरु करण्यात आलेत,तेेथील परिस्थिती बिकट दिसून येत आहे.