485 ग्रॅम गांजासह आरोपीस अटक

0
62

सालेकसा,दि.१२ः येथील पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या तेलीटोला येथे अवैधरित्या गांजा साठवून ठेवणाऱ्या एका 65 वर्षीय इसमाकडून 485 ग्रॅम ओलसर हिरवट गांजा जप्त करुन सालेकसा पोलिसांनी अटक केली आहे.या गांजाची एकूण बाजारभावाने किंमत सुमारे ₹9,700/- असल्याचे पोलिसांनी सांगितले. शंकर हिरामन लांजेवार (रा. तेलीटोला, ता. सालेकसा, जि. गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक भूषण बुराडे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन दिनांक 11 मे 2025 रोजी दुपारी 1:06 ते सायंकाळी 5:30 दरम्यान आरोपीच्या घरी झडती घेतली. या दरम्यान आरोपीच्या पलंगाच्या गादीखाली लपवून ठेवलेला गांजा सापडला.

जप्त केलेला मुद्देमाल:193 ग्रॅम ओलसर हिरवट पाला – किंमत ₹3,860/- 292 ग्रॅम बी मिश्रीत पाला – किंमत ₹5,840/-(प्रति किलो ₹20,000/- प्रमाणे एकूण वजन: 485 ग्रॅम) झडतीदरम्यान मिळालेला गांजा पंचासमक्ष जप्त करून त्याचे नमुने केमिकल अनालिसिस (सी.ए.) साठी वेगळे करण्यात आले. उर्वरित माल घटनास्थळीच सिलबंद करण्यात आला असून, आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, 1985 अंतर्गत कलम 8, 20(अ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, व डी.वाय.एस.पी प्रमोद मडामे (आमगाव विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कार्यवाहीत सपोनी युवराज पोठरे, पो.ह. गणेश सोनजाल, तुरकर, पो.शि. वेदक, रामप्रसाद मेंढके, जितेंद्र पगारवार, मनोहर कांबळे, विकास हेमने तसेच महिला पोलीस छबु भेदे यांचा सहभाग होता.