गोंदिया,दि.१२ःगोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या कारंजा येथे जुन्या वैमन्यासातून सावकाराची हत्या करण्यात आल्याची घटना फुलचूर ते कवलेवाडा मार्गावरील भद्रुटोलाजवळ आज १२ मे रोजी उघडकीस आली.या हत्या प्रकरणात ४ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मृतकाचे नाव महेंद्र मदारकर(४५रा.कारंजा)असे आहे.सदर घटनेची माहिती कारंजा येथील पोलीस पाटील अलका रंगारी यांनी पोलिसांना दिली.त्यानंतर गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत काळे हे आपल्या ता्फ्यासह घटनास्थळी दाखल होत तपास कार्याला सुरवात केली.सदर मृतकाचा मृतदेह हा गावात एका घराचे बांधकाम सुरु असलेल्या काॅलमच्या खड्यात आढळून आला.या प्रकरणात माहितीच्या आधारे कारंजा येथीलच राज गब्बर(वय ३५),अजय कलाने(वय ३३),गुलशन उईके(वय ३०)व कृष्ण सत्यवान मेश्राम यांना संशयाच्या आधारे ताब्यात घेण्यात आले आहे.मृतक हा गावात सावकारी करायचा तसेच गुंड प्रवृत्तीचा होता.मृतक महेंद्र मदारकरचा गावातीलच काही तरुणांशी काही दिवसापुर्वी वादावादी झालेली होती.त्यावेळी मदारकरने बघुन घेण्याची धमकी तरुणांना दिली होती.त्यातच आज महेंद्र मदारकर हा सकाळच्या वेळी घराशेजारी फिरत असतांना गावातील तरुणांनी त्याला घेरले,दरम्यान आपला जीव वाचविण्याकरीता महेंद्र हा भ्रद्रुटोल्याच्या दिशेने पळत असताना घराच्या बांधकामाकरीता खोदलेल्या खड्यात पडला.आणि पाठलाग करीत आलेल्या तरुणांनी त्याला तिथेच तलवारीने वार करीत ठार केल्याचे पोलिसांनी सांगितले.