वत्सगुल्म जलतारा स्पर्धेला ३० मे पर्यंत मुदतवाढ

0
8
वाशिम, दि. १९ मे – वाशिम जिल्ह्यात भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी जलसंधारण उपाययोजनांचा एक भाग म्हणून ‘जलतारा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या वत्सगुल्म जलतारा स्पर्धेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत ५८६ गावांनी सहभाग नोंदविला आहे.
यापूर्वी स्पर्धेची अंतिम मुदत २० मे २०२५ निश्चित करण्यात आली होती. तथापि, अनेक गावांनी सहभागी होण्यासाठी अतिरिक्त कालावधीची मागणी केल्याने, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या आदेशानुसार वत्सगुल्म जलतारा स्पर्धेची अंतिम मुदत ३० मे २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
मुदतवाढीचा मुख्य हेतू अद्याप सहभागी न झालेल्या तसेच जलसंधारणाच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या पाणीटंचाईग्रस्त गावांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे सर्व गावांनी, विशेषतः जिथे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर आहे अशा गावांनी जलतारा उभारणीसाठी तातडीने पुढाकार घेऊन स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जलतारा उपक्रमाद्वारे भूगर्भातील पाणी साठवण क्षमता वाढविली जाते. पावसाचे पाणी शोषून घेण्यासाठी तयार केलेले हे शोष खड्डे जमिनीत नैसर्गिक जलसाठा निर्माण करतात. त्यामुळे विहिरी, हापशी, बंधारे आदी जलस्रोतांमध्ये पाणी पातळी वाढून उन्हाळ्यातील टंचाईवर प्रभावी नियंत्रण मिळविता येते.
प्रशासनाने सर्व ग्रामपंचायती, ग्रामविकास अधिकारी व स्थानिक नेतृत्व यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी एकरी एक जलतारा उभारण्याच्या ध्येयाने या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा. वाढविलेल्या मुदतीचा लाभ घेऊन अधिकाधिक गावांनी स्पर्धेत सहभाग घेतल्यास जिल्ह्यातील जलसंधारणाचा उद्देश साध्य होईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.