मिलिंद तेलतुंबडेचा अंगरक्षक राहिलेला नक्षलवादी देवसूने केले आत्मसमर्पण

0
640

गोंदिया जिल्हा पोलीसांची यशस्वी कामगिरी….2024-2025 मध्ये 3 माओवाद्यांचे आत्मसमर्पण.!

गोंदिया,दि.२०ः गेल्या काही वर्षापासून नक्षलवादी चळवळीत कार्यरत असलेला प्लाटून मेंबर (CC मेंबर दिपक उर्फ मिलिंद तेलतुंबडे (मृत) याचा बॉडी गार्ड) राहिलेल्या देवसू उर्फ देसु (मूळ नाव – देवा राजा सोडी), वय 24,रा- चीटिंगपारा/ गुंडम,पोस्ट – पामेड, पो. स्टे. तर्रेम, तालुका- उसूर, जिल्हा- बिजापूर (छ.ग.)याने १९ मे रोजी गोंदिया पोलिसासमोर आत्मसमर्पण केले आहे.याच्यावर ३.५० लाख रुपयाचे बक्षिस ठेेवण्यात आले होते.देवसू उर्फ देसू यांनी गोंदिया ,गडचिरोली व छत्तीसगडमधील ५ नक्षल चकमकीत सहभाग नोंदवला होता.

जिल्हा पोलीस दलाच्या प्रभावी नक्षलविरोधी मोहिमेमुळे सन 2024-2025 मध्ये आत्तापर्यंत 3 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.यामध्ये सन 2024 मध्ये संजय पुनेम व देवा मुडाम या दोन माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते.तर 19 मे 2025 रोजी गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे,अपर पोलीस अधीक्षक,नित्यानंद झा, यांचेसमक्ष देवसू उर्फ देसु (मूळ नाव – देवा राजा सोडी) या एका जहाल माओवादीने आत्मसमर्पण करून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आत्मसमर्पित माओवादी – देवसू उर्फ देसु उर्फ देवा हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील गावातील रहिवासी असून त्याचे गावात नक्षल्यांचे नेहमी येणे जाणे होते. नक्षलवादी जल, जंगल, आणि जमिनीच्या लढाई खाली भोळ्या – भाबड्या आदिवासी नागरिकांना सरकार विरुद्ध भडकावून, तथाकथित व खोट्या क्रांती चे कथन करून लोकांना नक्षल चळवळीत ओढण्याचा प्रयत्न करायचा.त्यामुळे लहानपणापासून तो नक्षलयांच्या विविध प्रलोभन व भूलथापांना बळी पडून नक्षल विचारसरणीशी प्रभावित होऊन बाल संघटन मध्ये रुजू झाला.त्यानंतर ऑक्टोंबर 2017 मध्ये पामेड पी.एल. 9 मध्ये भरती झाला आणि शासनाविरुद्ध शस्त्र हाती घेतले. माहे- डिसेंबर 2017 मध्ये त्याला इतर काही नवीन भरती झालेल्या माओवाद्यांसह एम. एम. सी. झोन मध्ये पाठविण्यात आले…. एप्रिल 2018 मध्ये तो आपल्या साथीदारांसह एम. सी. सी. झोन (विस्तार एरिया) मध्ये आला. तिथे दरेकसा, तांडा, मलाजखंड, पी.एल 3 या नक्षल दलम सोबत 8-15 दिवस काम केल्यानंतर त्यास तत्कालीन एम. एम. सी. झोन प्रभारी मिलिंद उर्फ दीपक तेलतुंबडे (सेंट्रल कमिटी मेंबर / सद्या मृत) याचे अंगरक्षक म्हणून नेमण्यात आले होते.13 नोव्हेंबर 2021 रोजी मर्दिनटोला, जिल्हा- गडचिरोली येथे नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे याचेसह एकूण 28 नक्षलवादी मारले गेले. सदर चकमकीतून माओवादी देवसु व त्याचे काही साथीदार जीव वाचवून पळून गेले. तेथून माड एरिया मध्ये काम केले. त्यानंतर परत पामेड पी एल 9 मध्ये मध्ये काम केले आहे.सदर माओवादी देवसू उर्फ देसू उर्फ देवा याने सन 2017-2022 मध्ये माओवादी संघटनेत कार्यरत असताना गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात घडलेल्या विविध गुन्ह्यात सहभागी असल्याचे कबूल केले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक गोरख भामरे, आणि अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाते, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे, अंमलदार स.फौ. अश्विनीकुमार उपाध्याय, पोहवा. अनिल कोरे, पो.शी. अतुल कोल्हटकर, चंदन पटले, मपोशी. लीना मेश्राम, चालक पो.ना. उमेश गायधने नक्षल सेल गोंदिया यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.