
आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीमुळे सुरेखा शिंदे पुन्हा स्वत:च्या पायावर उभ्या झाल्या
चंद्रपूर- २८ वर्षापासून संधीवाताच्या असह्य वेदनांचा सामना करत असतानाच एकदिवस चालणे अवघड झाले आणि अंथरुणात खिळून पडावं लागलं. ६३ वर्षीय माउलीच्या या वेदनेवर फुंकर म्हणून संवेदनशील मनाचे नेते अशी ओळख असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार मदतीला धावून आले. त्यांच्या मदतीमुळे आज सुरेखा शिंदे स्वत:च्या पायावर उभ्या झाल्या आणि चालू लागल्या. आमदार श्री. सुधीर मुनंगटीवार यांच्या संवेदनशील कृतीने या माउलीच्या लेकीला आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानताना गहिरवरुन आले.
सोलापूर जिल्ह्यातील पाकणी येथील ६३ वर्षीय सुरेखा शहाजी शिंदे या गेल्या २८ वर्षांपासून संधिवाताने ग्रस्त होत्या. २०१९ पासून त्यांच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना सुरू झाल्या आणि अखेर त्या अंथरुणावरच खिळून राहिल्या. डॉक्टरांनी दोन्ही पायांचे टोटल ‘नी रिप्लेसमेंट’ करण्याचा सल्ला दिला. मात्र या उपचारासाठी ५ लाख रुपयांचा मोठा खर्चही सांगितला. एकीकडे भाऊ सुद्धा ‘बेकर्स मस्कुलर डिस्ट्रॉफी’ने ग्रस्त असल्यामुळे आईच्या उपचाराची जबाबदारी नागपूरकर मुलगी सौ. राजकन्या वाघमारे यांच्यावर आली. सौ. राजकन्या यांनी आईच्या उपचारासाठी धावपळ सुरु केली. त्यांनी बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्ते मोहित डंगोरे यांच्याशी संपर्क साधला. श्री. डंगोरे यांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांना संपूर्ण परिस्थिती निदर्शनास आणून दिली. जनतेच्या समस्यांसाठी नेहमी तत्पर असलेल्या श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ दखल घेतली व मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नरिमन पॉईंट येथील डॉक्टरांशी संपर्क साधून त्वरित मदत करण्याची विनंती केली.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सूचना देताच वैद्यकीय चमूने रुग्णाच्या उपचाराची व्यवस्था केली. मुंबई येथे २६ एप्रिल २०२५ रोजी सुरेखा शिंदे यांच्या उजव्या पायाची आणि २ मे २०२५ रोजी डाव्या पायाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. आज सुरेखाताई पुन्हा स्वतःच्या पायांवर चालू लागल्या आहेत.
‘माझे भाऊ ‘बेकर्स मस्कुलर डिस्ट्रॉफी’ने ग्रस्त असल्यामुळे मला एकटीलाच ही धावपळ करावी लागली. पण श्री. मोहित डंगोरे, आरोग्य सेवक सागर खडसे यांनी सहकार्य केले. संवेदनशील नेते श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मला सख्ख्या भावाप्रमाणे साथ दिली. सुधीरभाऊंचे नेतृत्व आणि संवेदनशील कार्यसंस्कृतीमुळे माझी आई चालू लागली आहे’, अशी भावना सौ. राजकन्या वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.
जनतेच्या आरोग्यासाठी आरोग्य तपासणी शिबिरे, मोफत शस्त्रक्रिया मदत, चष्मे वितरण, रक्तदान शिबिर अशा विविध आरोग्यविषयक उपक्रमातून आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला सुविधा निर्माण करुन देण्याचे कार्य सतत केले आहेत. त्याही पुढे सोलापूर जिल्ह्यातील माउलीसाठी धावून जात सामान्यांच्या जीवनात आशेचा किरण ठरणारा लोकनेता म्हणून आमदार श्री. मुनगंटीवार पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.