34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ नवेगाव-नागझिरा प्रकल्पातील ESZ सीमारेषा कमी होणार; आमदार डॉ. परिणय फुके

नवेगाव-नागझिरा प्रकल्पातील ESZ सीमारेषा कमी होणार; आमदार डॉ. परिणय फुके

0
116

blank

गोंदिया/भंडारा,दि.०३ः – नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या इको-सेंसिटिव्ह झोन (ESZ) संदर्भात निर्माण झालेला संभ्रम आता दूर होणार आहे. ESZ चा अतीविस्तार आणि त्यातून स्थानिक विकासकामांवर आलेले निर्बंध लक्षात घेता, आमदार डॉ. परिणय फुके यांनी या विषयावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ESZ चे पुनःसीमांकन करण्याचे आदेश दिले आहेत.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात ESZ क्षेत्र खूपच मोठ्या प्रमाणात निश्चित करण्यात आले होते. परिणामी, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील २१६ हून अधिक गावे या झोनमध्ये आली होती. या झोनमुळे औद्योगिक विकास, गृहनिर्माण प्रकल्प आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासावर मोठे बंधन आले होते. स्थानिक नागरिक, उद्योजक आणि शेतकरी यांना यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार डॉ. परिणय फुके यांनी वनमंत्र्यांसमोर हा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मागणीची दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित विभागाला तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. यानुसार, ESZ चे पुनःसीमांकन करण्यात येणार असून ते व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनच्या आधारावर ठरवले जाईल. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करतानाच स्थानिक विकासालाही चालना मिळणार आहे.

या निर्णयामुळे गेल्या काही वर्षांपासून रखडलेले MIDC, निवासी योजना, रस्ते आणि इतर सार्वजनिक प्रकल्पांना गती मिळेल. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि संपूर्ण जिल्ह्याचा विकास वेग घेईल.

या निर्णयाबाबत बोलताना आमदार डॉ. परिणय फुके म्हणाले की, “ESZ मुळे स्थानिक नागरिकांना जे गैरसोयींना सामोरे जावे लागत होते, त्या समस्यांचा मी सातत्याने पाठपुरावा केला. वनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाहीचे आदेश दिले आहेत, हे जनतेच्या विजयाचे उदाहरण आहे. पर्यावरण व विकास यामध्ये योग्य तो समतोल राखतच हा निर्णय घेण्यात येत आहे.”या निर्णयामुळे नवेगाव-नागझिरा प्रकल्पाच्या सभोवतालच्या गावांना दिलासा मिळणार असून गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. स्थानिक पातळीवर या निर्णयाचे स्वागत होत आहे.

blank