
* अग्निशमन अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे लोकार्पण
* शहराच्या वैभवात भर घालणारे व्यापारी संकुल उभारण्याचे नियोजन
* न्यायालय इमारत आणि भूमिगत गटार योजनेसाठी पाठपुरावा
लातूर, दि. 08 : अहमदपूर शहरात पायाभूत सुविधांची निर्मिती करून विकासाला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असल्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
अहमदपूर नगरपालिकेच्या अग्निशमन अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थान इमारतीचे लोकार्पण सहकारमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा नगरपालिकेच्या प्रशासक मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्ज्वला पांगरकर, मुख्याधिकारी संतोष लोमटे आदी उपस्थित होते.
जिल्हास्तर योजनेंतर्गत अग्निशमन आणि आणीबाणी सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना सुसज्ज निवासस्थाने उपलब्ध झाली आहेत. तसेच, नगरपालिकेला एक मिनी रेस्क्यू टेंडर वाहन सुपूर्द करण्यात आले. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ आणि प्रभावी मदत मिळण्यास मदत होईल, असा विश्वास सहकारमंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केला.
कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी अहमदपूर नगरपालिकेने योग्य नियोजन करून आवश्यक प्रस्ताव तयार करावेत, असे निर्देश सहकारमंत्री श्री. पाटील यांनी दिले. शहराच्या वैभवात भर घालणारे सर्व सुविधांनी युक्त व्यापारी संकुल उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे युवकांना उद्योग आणि व्यवसायासाठी जागा उपलब्ध होईल. तसेच, न्यायालय इमारत उभारणी आणि शहरात भूमिगत गटार योजना राबवण्यासाठीही प्रयत्न सुरू असून, या कामांसाठी पुरेसा निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
नगरपालिकेच्या शाळांमध्ये दर्जेदार प्राथमिक शिक्षण देण्यासाठी डिजिटल क्लासरूमसारखे उपक्रम राबवावेत, असेही सहकारमंत्री श्री. पाटील यांनी सुचवले. तसेच, नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अहमदपूर शहरात अद्ययावत सभागृह उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात मुख्याधिकारी संतोष लोमटे यांनी निवासस्थान इमारतीविषयी आणि नगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती दिली. शहरातील प्रस्तावित विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाल्यास विकासाला गती मिळेल, असे त्यांनी सांगितले.
मिनी रेस्क्यू टेंडर वाहनामुळे आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा बळकट
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत अहमदपूर नगरपालिकेला मिनी रेस्क्यू टेंडर वाहन प्राप्त झाले आहे. हे वाहन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते नगरपालिकेला सुपूर्द करण्यात आले. आग नियंत्रण, इमारत कोसळणे, अपघात, पूर, बचाव कार्य, नैसर्गिक आपत्तीतील शोध आणि बचाव मोहिमा तसेच औद्योगिक अपघातांमध्ये मदत व बचावासाठी हे वाहन उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये अग्निशमन उपकरणे, कटर टूल्स, प्राथमिक उपचार साहित्य, वॉटर मिस्ट यंत्रणा, प्रकाश व्यवस्था आणि बचाव साहित्य यांचा समावेश आहे.