
गोंदिया 10 :- शिक्षण व आरोग्य हे प्रत्येक बालकांचे मूलभूत अधिकार असून, भारतीय राज्यघटनेनुसार यांचे संरक्षण अत्यावश्यक आहे. या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी बालकामगार प्रथेला आळा घालणे गरजेचे आहे. या अनुषंगाने 12 जून हा दिवस ‘जागतिक बालकामगार प्रथाविरोधी दिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो.
बालमजुरी ही सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक समस्यांशी निगडित असून याबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. 1986 पासून केंद्र शासनाने बाल व किशोरवयीन कामगारांसाठी अधिनियम पारित केला आहे. या कायद्यानुसार 14 वर्षांखालील मुलांकडून कोणतेही धोकादायक किंवा अयोग्य काम करून घेणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच, 14 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांकडून धोकादायक उद्योगांमध्ये काम करून घेणेही बेकायदेशीर आहे. यासाठी दोषींवर पन्नास हजार पर्यंत दंड अथवा दोन वर्षांपर्यंत शिक्षा अशी तरतूद आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सर्व दुकानदार, आस्थापनांचे मालक, उद्योगपती, बांधकाम व्यावसायिक, वितरक, व्यापारी व इतर संबंधित घटकांना बालकामगार न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोणी बालकामगार ठेवत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन गोंदिया येथील सहाय्यक कामगार आयुक्त रा.मो. धुर्वे यांनी केले आहे.