
गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर गुरुवारी दुपारी एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातावेळी विमानात प्रवाशी आणि क्रू मेंबर्स मिळून 242 जण होते. हे विमान मेघानी नगर परिसरात कोसळल्यानंतर मोठा स्फोट (Ahmadabad Plane Crash) झाला. या स्फोटामुळे विमानामधील प्रवाशी आणि क्रू मेंबर्सच्या शरीराचा अक्षरश: कोळसा झाला. यामुळे त्यांचे मृतदेह देखील ओळखता येत नव्हते. परंतु, इतक्या भीषण अपघातामधून रमेश विश्वासकुमार (Ramesh Vishwashkumar) हा एकमेव प्रवासी बचावला. रमेश विश्वासकुमार यांना दुखापत झाली असली तरी ते अगदी चालत रुग्णवाहिकेपर्यंत गेले. रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी विमान अपघातावेळी नेमके काय घडले, याची माहिती दिली.
रमेश विश्वासकुमार हे भारतीय वंशाचे ब्रिटीश नागरिक आहेत. ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भावासोबत भारतात आले होते. त्यांनी सांगितले की, अपघातानंतर मी उठलो तेव्हा माझ्या आजुबाजूला मृतदेह पडले होते. मी प्रचंड घाबरलो होतो. मी उठून उभा राहिलो आणि धावायला लागलो. माझ्या अवतीभवती सगळीकडे विमानाचे तुकडे पसरले होते. त्यानंतर काही लोकांनी मला धरले आणि रुग्णालयात आणले, असे रमेश विश्वासकुमार यांनी सांगितले.