33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ गेल्या १३ वर्षांपासून दुर्मिळ निगेटिव्ह रक्ताची व्यवस्था करणारे रक्तमित्र गुड्डू चांदवानी

गेल्या १३ वर्षांपासून दुर्मिळ निगेटिव्ह रक्ताची व्यवस्था करणारे रक्तमित्र गुड्डू चांदवानी

0
59

blank

१४ जून – जागतिक रक्तदाता दिन विशेष

आईच्या प्रेरणेतून सेवेसाठी घेतलेला संकल्प

हजारो रुग्णांचे प्राण वाचवले वेळेवर रक्तदान करून

गोंदिया-: म्हणतात, जेव्हा प्रेरणा आईकडून मिळते आणि उद्देश सेवा असतो, तेव्हा कार्य केवळ कर्तव्य राहत नाही, तर ते एक मिशन बनते. असाच एक प्रेरणादायी चेहरा म्हणजे गोंदिया येथील विनोद ‘गुड्डू’ चांदवानी, जे गेल्या १३ वर्षांपासून O-, A-, B- सारख्या दुर्मिळ निगेटिव्ह रक्तगटाच्या रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्याचे कार्य निस्वार्थपणे करत आहेत.

त्यांना ही सेवा वृत्ती त्यांच्या आई स्वर्गीय पुष्पादेवी चांदवानी यांच्याकडून मिळाली. एक वेळ अशी आली होती जेव्हा त्यांच्या आईला A- निगेटिव्ह रक्ताची तातडीने गरज होती.आणि संपूर्ण शहरात कुणीही रक्तदाता मिळत नव्हता.तेव्हा विनोद खूप अस्वस्थ झाले होते.अनेक तास प्रयत्न केल्यानंतर जेव्हा एखादा रक्तदाता तयार होत असे,तेव्हा ते त्या व्यक्तीत देवाचे रूप पाहत.ह्याच अनुभवातून प्रेरणा घेत त्यांनी ठरवले की, भविष्यात कुणालाही ही वेदना सहन करावी लागू नये. त्यांनी स्वतःला सामाजिक सेवेस समर्पित केले आणि निगेटिव्ह रक्तदात्यांची एक मजबूत टीम तयार केली.

आजपर्यंत हजारो रुग्णांना वेळेवर दुर्मिळ रक्त मिळवून दिले आहे.मग तो नवजात बालक असो, वृद्ध असो किंवा अपघातग्रस्त कुणी.अनेक वेळा ते मध्यरात्री रक्तदात्यांशी संपर्क साधून रक्ताची व्यवस्था करतात.थॅलेसीमिया, सिकलसेल अशा गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांनाही ते नियमित मदत करत असतात. त्यांच्या या कार्यासाठी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने तत्कालीन पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे.आज ‘गुड्डू’ हे नाव केवळ व्यक्तीचं नाव न राहता, गरजूंना धडपडून मदत करणाऱ्या ‘रक्तमित्र’ या ओळखीने समाजात परिचित झाले आहे.

blank