
धाराशिव,दि.20 जून – डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात जैविक शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी आज महत्त्वपूर्ण पाहणी दौरा झाला.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.,मैनाक घोष यांनी मौजे वरुडा (ता.धाराशिव) येथील धाराशिव शिवार सारथी शेतकरी उत्पादक कंपनीच्या जैविक निविष्ठा संसाधन केंद्र व शेतबांधावरील प्रयोगशाळेची प्रत्यक्ष पाहणी केली.
या दौऱ्यात मौजे ढोकी (ता. धाराशिव) येथे रामभाऊ केरबा पवार यांच्या शेतावर बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ.मैनाक घोष यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत बीबीएफ (Broad Bed Furrow) पद्धतीने सोयाबीन पेरणी केली आणि टोकन यंत्राद्वारे लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवले.
त्यानंतर शंखी गोगलगायी नियंत्रण प्रात्यक्षिक देखील राबविण्यात आले. दौऱ्याचा पुढील टप्पा मौजे तडवळा येथे पार पडला,जिथे बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत (SMART) पीकलँड शेतकरी उत्पादक कंपनीला भेट देण्यात आली.यावेळी बीजोत्पादन व क्लिनिंग-ग्रेडिंग युनिटची पाहणी करण्यात आली.या निरीक्षण दौऱ्यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.