33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ दुधात भेसळ थांबविण्यासाठी जिल्ह्यात धडक मोहीम राबविण्याचे आदेश

दुधात भेसळ थांबविण्यासाठी जिल्ह्यात धडक मोहीम राबविण्याचे आदेश

0
54
gondia

blank

गोंदिया, दि.20 : गोंदिया जिल्ह्यात दुधात होणाऱ्या भेसळीविरुध्द कारवाई करण्यासाठी नुकतीच अपर जिल्हाधिकारी मीनाज मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. सदर धडक मोहीम विभागातील सर्व जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे.

         राज्यात दूध भेसळ रोखण्याच्या अनुषंगाने 28 जून 2023 रोजी शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला असून त्यानुसार दुधात होणाऱ्या भेसळीस आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी हे आहेत. अपर पोलीस अधीक्षक, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उपनियंत्रक वैध मापनशास्त्र यांची सदस्य तर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांची सदस्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

         यावेळी अपर जिल्हाधिकारी मीनाज मुल्ला यांनी सदर समिती सदस्यांना दुधात भेसळ करणाऱ्याविरुध्द कडक कार्यवाही करण्याचे व तात्काळ गुन्हा नोंदवून कार्यवाही करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये धडक भेसळ तपासणी करण्यात आलेल्या नमुन्यापैकी किती नमुन्यात केसेस सुरु आहे याचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाकडून प्राप्त करुन घ्यावेत. मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या संस्था/आस्थापना यांची यादी उपलब्ध करुन तसेच हॉटेल्समध्ये भेटी देवून पनीर, दही इत्यादी दुग्धजन्य पदार्थ तपासावेत. महामार्गावर थांबून सकाळी 7 ते 10 या वेळेत शहरात येणाऱ्या दुधाची तपासणी करावी, तसा अहवाल सादर करावा असे आदेशित केले आहे.

        गोंदिया जिल्ह्यातील सर्व दूध विक्रेता, दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादक यांनी उच्च गुणप्रतीचे, भेसळ विरहीत दूध व दुग्धजन्य पदार्थ्यांची विक्री करावी. गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना दुध व दुग्धजन्य पदार्थात भेसळी बाबत तक्रार करावयाची असल्यास अपर जिल्हाधिकारी कार्यालय व दुग्धशाळा व्यवस्थापक शासकीय दूध योजना कार्यालय गोंदिया यांना कळवावे, असे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे.

blank