राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे आमदार पुराम यांना निवेदन

0
21

देवरी,19 (berartimes.com)- येत्या मार्च महिन्यामध्ये मुदत संपत असल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रुग्णसेवा देणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्यांच्या सेवेची दखल घेऊन या कर्मचारी व अधिकाऱ्यांना समकक्ष पदावर कायम ठेवण्याविषयीच्या मागणीचे निवेदन राज्यशासनाला आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांचे मार्फत पाठविण्यात आले आहे.
आज शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास स्थानिक आमदार संजय पुराम यांच्या जनसंपर्क कार्यालयात जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आ. पुराम यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ.मीनाक्षी वट्टी, कनिष्ठ अभियंता थनेंद्र येडे, जिल्हा सनियंत्रण व मूल्यांकन अधिकारी बिसेन, देवरीचे तालुका लेखापाल प्रकाश थोरात आदी अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता.
यावेळी झालेल्या चर्चेत शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे 2005 पासून संपूर्ण देशात राबविले जात असून एकट्या महारा्ष्ट्रात सुमारे 80 हजारावर कर्मचारी व अधिकारी यांची नेमणूक केली. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांनी वयाची 45वी गाठली असून त्यांनी लाखो रुग्णांची सेवा केली आहे. सदर योजना येत्या मार्च नंतर पुढे चालू ठेवली नाही तर अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबींयांवर उपासमारीची वेळ येईल. याशिवाय राज्याच्या आरोग्यसेवेवर त्याचे गंभीर परिणाम होतील. तरी रुग्णसेवेचा आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करून या योजनेला मुदतवाढ द्यावी किंवा अधिकारी व कर्मचारी यांना समकक्ष पदावर कायम ठेवण्यात यावे, अशी विनंती शिष्टमंडळाच्या वतीने राज्य शासनाला करण्यात आली आहे. यावेळी आमदार पुराम यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, सरकार या विषयावर गंभीर आहे. मी सुद्धा कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारशी चर्चा करून हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांना दिले.
शिष्टमंडळात जिल्ह्यातील सर्व लेखापाल, डाटा ऑपरेटर, आरोग्य सेविका, आरोग्य साहाय्यिका, आशा समन्वयक आदी कर्मचारी व अधिकारी यांचा समावेश होता.