सिंधूने इतिहास घडवला, रौप्य पदक पटकावलं

0
6

वृत्तसंस्था
रिओ डि जानिरो : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कॅरोलिना मरिनच्या अनुभवासमोर भारताची पी. व्ही. सिंधू अगदी थोडक्‍यात कमी पडली. अत्यंत चुरशीने आणि जिद्दीने खेळल्या गेलेल्या बॅडमिंटनच्या अंतिम लढतीत मरिनने सिंधूवर 2-1 अशी मात केली. सिंधू रौप्य पदकाची मानकरी ठरली. बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक पटकाविणारी सिंधू ही पहिलीच भारतीय आहे. ऑलिंपिक पदक मिळविणारी सिंधू ही सर्वांत तरुण भारतीय खेळाडू आहे. वयाच्या 21 व्या वर्षीच तिने ही कामगिरी केली आहे.

कॅरोलिन मरिन ही बॅडमिंटनमधील अनुभवी खेळाडू आहे. आतापर्यंत तिने जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धा आणि युरोपीय स्पर्धांमध्ये प्रत्येकी दोन वेळा विजेतीपदे पटकाविली आहेत. डावखुऱ्या मरिनसमोर खेळणे हेच अनेक खेळाडूंना जड जाते. आतापर्यंत कॅरोलिनाने 239 विजय मिळविले आहेत, तर केवळ 74 पराभव स्वीकारले आहेत. पण कॅरोलिनच्या गत कामगिरीचे दडपण न घेता सिंधू खेळली. तब्बल एक तास 20 मिनिटे हा सामना सुरू होता.

सामन्याच्या पहिल्या गेमपासून सिंधू-मरिनमध्ये कडवी लढत सुरू झाली होती. पिछाडी भरून काढत सिंधूने पहिला गेम 21-19 असा जिंकला. यामुळे मरिनवर दडपण आले होते. पण अनुभवी मरिनने दुसऱ्या गेममध्ये धडाक्‍यात सुरवात केली. जोरदार स्मॅशच्या जोरावर तिने सिंधूला या गेममध्ये पुनरागमनाची संधी दिली नाही. हा गेम सिंधूने 12-21 असा गमावला.