पिंपळदरी आदिवासी वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या

0
49

औंढा नागनाथ,दि.२६ : तालुक्यातील पिंपळदरी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहत असलेल्या स्वाती सुखदेव झाटे (वय १५) या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने बुधवारी (२५ जून) संध्याकाळी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. तिने खोलीत ओढणीने सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. वसतिगृहाच्या अधीक्षकांनी तिचा गळफास काढून तिला तातडीने पिंपळदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला हिंगोली जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. स्वाती ही पहिल्यापासून आश्रमशाळेत शिक्षण घेत होती. तिच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्वातीचे वडील सुखदेव झाटे यांनी मंगळवारी (२४ जून) तिला शाळेत आणले होते. जातीचे प्रमाणपत्र शाळेतूनच मिळणार असल्याने ते बुधवारी सकाळी पुन्हा शाळेत आले आणि मुलीशी संवाद साधून परतले. त्या भेटीनंतर अवघ्या काही तासांतच ही घटना घडली. दुपारी स्वातीने इतर विद्यार्थिनींसोबत जेवण केले आणि “खोलीत जाते” असे सांगून गेल्यानंतर काही वेळातच तिने गळफास घेतल्याचे उघड झाले. घटनेनंतर नातेवाईकांनी शवविच्छेदनास विरोध दर्शवला होता. रात्री उशिरापर्यंत औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने पिंपळदरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून आश्रमशाळेतील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.