38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ कागदावर गाळ काढणे सुरु; मात्र प्रत्यक्षात गौण खनिजाचे तलावातून उत्खनन?

कागदावर गाळ काढणे सुरु; मात्र प्रत्यक्षात गौण खनिजाचे तलावातून उत्खनन?

0
420
दवडीपार येथील तलाव जिथे गाळ उपसाच्या नावावर मुरुम व भिसारी मातीचे उपसा करण्यात आले

blank

गोंदिया(खेमेंद्र कटरे) : राज्य शासनाची गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हे महत्त्वाकांशी योजना सुरू आहे. त्यात तलावातील गाळ काढून तलावाचे पुनरुज्जीवन करावे असे आदेश आहे. त्याचा फायदा घेत कागदोपत्री तलावांतील गाळ काढण्याचे काम सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी गाळाऐवजी सर्रास मुरूम, (Lake Minerals) माती उत्खनन केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकीकडे जलसंधारणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी खर्च होत असताना, दुसरीकडे नैसर्गिक साधनसंपत्तीची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू असल्याचे चित्र गोंदिया व भंडारा जिल्ह्यात आहे.

अनेक गावांमध्ये तलावातील गाळ काढण्याचे आदेश दिले आहेत. या कामांचा उद्देश तलावांची साठवण क्षमता वाढवणे आणि भूजल पातळी सुधारणे हा आहे. मात्र, या संधीचा गैरफायदा घेत काही ठेकेदार घेत असून गाळाच्या नावाखाली जेसीबी लावून तलावांच्या खोलवर भागातून मुरूम काढत आहेत. हा मुरूम नंतर शासकीय व खाजगी कामासाठी विक्री केला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. विशेषत: या योजनाचा लाभ शेतकर्‍यांना व्हावा हा त्यामागील मुख्य हेतू आहे. याकरिता शासकीय अनुदानही शेतकर्‍यांना दिला जातो.

अडीच हेक्टर शेती असलेल्या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ घेता येते. शासन त्याकरिता अनुदानही थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करते. परंतु स्थानिक शेतकर्‍यांना याबाबत माहितीच नाही. तलावातील गाळ काढून शेतीत ती घालून शेतमालाचे उत्पादन वाढण्याकरिता ही योजना शासनाने येथे सुरू केली आहे. परंतु येथे महत्त्वकांशी शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. गाळ काढल्याने तलावांची खोली वाढून पाणी साठवण क्षमता वाढते, पण मुरूम उपसल्याने तलावांची नैसर्गिक रचना बिघडते आणि पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो. परंतु याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही.

लघु पाटबंधारे विभागाचा तलाव

दवडीपार,अदासी,खमारी,सिरपूरबांध शिवारातील तलाव हे विस्तीर्ण असून या (Lake Minerals) तलावात मुरूम मोठ्या प्रमाणात या तलावाची मालकी व नियंत्रण लघुपाटबंधारे व पाटबंंधारे विभागाकडे आहे. त्यामुळे या तलावाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची जबाबदारी निश्चितच या विभागाची आहे.परंतु येथे मुरमाचे सर्रास उत्खनन सुरू असूनही त्याकडे मात्र अद्यापही पाटबंधारे विभागाचे लक्ष गेले नाही काय असा प्रश्न ते उपस्थित होतो. तलावातून जेसीबीने मुरुमाचे उत्खनन रात्री व दिवसाही सुरू आहे. याकडे स्थानिक महसूल प्रशासनाचेही दुर्लक्ष दिसत आहे. तलावातील मुरमाच्या वापर हा शासकीय कामावर व खाजगी कामावरही केला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या महसूल येथे बुडत आहे.blank

तलावाचे अस्तित्व धोक्यात

गाळ काढण्याच्या नावावर तलावाला पोखरले जात असल्याने या तलावाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तलावाच्या मध्यभागातून उत्खनन न करता तलावाच्या काठावरून मुरमाचे उत्खनन केले जात असल्याने तलावाच्या काठावरच मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता अधिक आहे.विशेष म्हणजे ज्या संस्थांना गाळ काढण्याचे काम दिले गेले,त्यांनी स्थाानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या मागणीकडेही दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे.

येथे गाळ काढायच्या नावाखाली दिवसाढवळ्या मुरूम काढला जात आहे. अधिकारी येथे केवळ कागदोपत्री पाहणी करतात की डोळेझाक करतात असा प्रश्न उपस्थित होत असून त्याच्या गंभीर परिणाम या परिसरातील शेतकर्‍यांना व सर्वसामान्यांना भोगावा लागणार आहे, (Lake Minerals) तलाव खोदकामामुळे पाण्याची पातळी निश्चितच आणखी येथे खाली जाईल. त्याचा फटका येथे बसणार आहे. या गंभीर प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन, प्रत्यक्षात गाळ काढला जात आहे की मुरूम, याची कठोरपणे तपासणी करण्याची गरज आहे. अन्यथा, जलसंधारणाचा हा देखावा केवळ कागदावरच राहील आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची अशीच लूट सुरू राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

blank