35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ माधवझरीऐवजी नवेगावबांध जलाशयात अरण्यऋषींचे अस्थी विसर्जन

माधवझरीऐवजी नवेगावबांध जलाशयात अरण्यऋषींचे अस्थी विसर्जन

0
631

blank

गोंदिया,दि.२८ : नवेगावबांधला ओळख मिळवून देणारे प्रसिद्ध पक्षितज्ज्ञ पद्मश्री तथा अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे १८ जून रोजी सोलापूर येथे निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्या अस्थी गोंदिया जिल्ह्यातील माधवझरी येथील माधवराव पाटील डोंगरवार यांच्या समाधिस्थळाच्या शेजारी विसावणार होत्या.मात्र, वनविभागाची परवानगी न मिळाल्याने शुक्रवारी (दि.२७) त्यांच्या अस्थी नवेगावबांध येथील जलाशयात विसर्जित करण्यात आल्या.तर तसेच माधवझरी येथील माधवराव पाटील डोंगरवार यांच्या समाधी शेजारी वटवृक्षाचे रोपण करण्यात आले.

पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे नवेगावबांधसोबत अनोखे नाते होते. त्यांनी वनाधिकारी म्हणून येथे जवळपास १२ वर्षे सेवा दिली. या काळात पवनीधाबे येथील त्यांचे गुरू माधवराव पाटील डोंगरवार यांच्याशी त्यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते. माधवराव पाटील यांनी चितमपल्ली यांना या जंगल परिसराची सखोल माहिती दिली. वन्यप्राण्यांना पाण्याची चणचण भासू नये यासाठी माधवझरी परिसर निर्माण केला. माधवराव पाटील यांचे निधन झाल्यानंतर याच परिसरात त्यांचा अंत्यविधी पार पडला होता. त्यामुळे मारुती चितमपल्ली यांनीसुद्धा माझ्याही अस्थी याच परिसरात पुरण्यात याव्यात, अशी इच्छा व्यक्त केली होती.

परवानगीसाठी दोन तास प्रयत्न
कौशल मिश्रा हे शुक्रवारी दुपारी चितमपल्ली यांचा अस्थी कलश घेऊन गोंदिया जिल्ह्यातील धाबेपवनी येथे नारायण पाटील डोंगरवार यांच्या घरी पोहोचले. यानंतर अस्थी माधवझरी परिसरात पुरण्यासाठी वन व वन्यजीव विभागाची परवानगी मागितली. हा परिसर संरक्षित क्षेत्रात येत असल्याने तब्बल दोन तास प्रयत्न करूनसुद्धा परवानगी न मिळाल्याने व्यथित होऊन अखेर कौशल मिश्रा व त्यांच्या सहकाऱ्यांनी नवेगावबांध जलाशयात अस्थी विसर्जित केल्या.

blank