
गोंदिया,दि.2: गोंदिया जिल्ह्यातील विशेष बाल पोलीस पथकासाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन प्रेरणा सभागृह, पोलीस मुख्यालय, कारंजा येथे दिनांक 24 जून 2025 रोजी करण्यात आले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, इंडियन सोसिअल वेल्फेअर सोसायटी व जिल्हा पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेमध्ये बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015, पॉक्सो कायदा 2012, बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 या कायद्यांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच बालकांशी संबंधित काम करणाऱ्या विविध यंत्रणांचे कार्य, बालकांची पुनर्वसन प्रक्रिया, कागदपत्रांची पूर्तता, बाल सहाय्यता कक्षांची आवश्यकता आणि 1098 चाईल्ड हेल्पलाईन च्या कार्यपद्धतीवर सखोल चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष प्रजित नायर यांच्या आदेशानुसार व पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रमुख समन्वयक म्हणून पोलीस उपअधीक्षक (गृह) आर. व्ही. शेवते व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन. के. वाळके होते. प्रमुख उपस्थितींमध्ये पोलीस निरीक्षक प्रविण मुंडे, दुकाने निरीक्षक पवन रोकडे, अध्यक्ष बाल कल्याण समिती देवका खोब्रागडे, परिविक्षा अधिकारी के. बी. रामटेके, संचालक आसरा शिशुगृह अशोक बेलेकर, अधिक्षिका शासकीय बालगृह श्रीमती मनिषा आंबेडारे यांचा समावेश होता.
कार्यशाळेत गोंदिया जिल्ह्यातील 16 पोलीस स्टेशनमधील एकूण 56 बाल पोलीस कर्मचारी, दामिनी पथकाचे सदस्य, भरोसा सेल, बाल कल्याण समितीचे सदस्य, बाल न्याय मंडळाचे प्रतिनिधी, चाईल्ड हेल्पलाईन व इंडियन सोसिअल वेल्फेअर सोसायटीचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र टेभुर्णे (संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष) यांनी केले, तर आभार पुनेश नाकाडे (माहिती विश्लेषक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष) यांनी मानले.