
गोंदिया,दि.०३ : गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने सर्वाधिक ११ जागा जिंकत जिल्हा बँकेवर वर्चस्व स्थापन केले. यानंतर परिवर्तन पॅनलच्या दोन संचालकांनी सहकार पॅनलला समर्थन दिले. त्यामुळे जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे बळ वाढले असून, आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.परिवर्तनच्या दोन संचालकांनी सहकारला समर्थन दिल्याने यांना सहकारनेच परिवर्तनच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याकरीता पाठविल्याचीही चर्चा सुरु झाली आहे.
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण २० संचालकांसाठी निवडणूक पार पडली. २९ जून रोजी मतदान आणि ३० जून रोजी मतमोजणी करण्यात आली. यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सहकार पॅनल तर काँग्रेस आणि इतर पक्षांनी मिळून परिवर्तन पॅनल तयार करुन ही निवडणूक लढविली होती. यात सहकार पॅनलने सर्वाधिक ११ जागा जिंकत जिल्हा बँकेवर वर्चस्व स्थापन केले. तर परिवर्तन पॅनलने ९ जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत खा. प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांची सुध्दा प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात अखेर खा. पटेल यांनी बाजी मारली. यानंतर आता परिवर्तन पॅनलचे पंकज यादव आणि अजय हलमारे या दोन संचालकांनी सहकार पॅनलला समर्थन दिले. त्याचे पत्रसुध्दा त्यांनी माजी आ. राजेंद्र जैन यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामुळे जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे बळ आणखी वाढले आहे.