
गोंदिया,दि.०३: महायुती सरकारने धानाला बोनस देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, खरीप हंगाम सुरू झाला तरीही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनस जमा करण्यात आला नाही. महाराष्ट्र किसान सभा गोंदिया जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून तीन दिवसांत बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास सत्ताधारी नेत्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.
महायुती सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस दोन हेक्टरपर्यंत देण्याची घोषणा गेल्या वर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली होती. मात्र, सहा महिन्यांनंतर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा केली. तर जिल्ह्यातील ७० हजारावर शेतकरी अद्यापही बोनसच्या प्रतीक्षेत आहेत.
सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून, बोनसची रक्कम जमा न झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शासनाने सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बोनसची रक्कम जमा करण्याची घोषणा केली होती. पण सद्यःस्थितीत शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा करण्यात आली. तर नोंदणीकृत शेतकरी अद्यापही बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शासनाने तीन दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा करावी, अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गोंदिया जिल्हा किसान सभेने दिला आहे