रेल्वे भाडेवाढ सामान्य जनतेवर अन्यायकारक-डॉ.हुलगेश चलवादी

0
16

पुणे,दिनांक ३ जुलै :-बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सुश्री मायावती जी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली आहे.सध्या देशात वाढती महागाई, बेरोजगारी आणि गरीबांचे मोठ्या प्रमाणावर शहरांकडे स्थलांतर सुरू असताना रेल्वे भाड्यांमध्ये वाढ करणे हे जनतेच्या हिताची पायामल्ली करणारे आहे, अशा शब्दात सुश्री बहन मायावती जी यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती पक्षाचे प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी गुरुवारी (ता.३) दिली.

शोषित, पीडित, उपेक्षित, वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आण्याचा मानस सरकारचा नसल्याचे यावरून पुन्हा एकदा अधोरेखित होत असल्याचे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.रेल्वे भाडेवाढ सर्वसामान्यांसाठी अन्यायकारक आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.केंद्र सरकारकडून ‘राष्ट्र प्रथम’ या नावाखाली जीएसटीप्रमाणेच रेल्वेमार्गेही सामान्य नागरिकांवर आर्थिक ओझं टाकलं जात आहे. ही प्रवृत्ती लोकशाही आणि संविधानाच्या कल्याणकारी तत्त्वांसाठी मारक आहे. अशा निर्णयांचा फटका देशातील गोरगरीब, कामगार आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसतोय,अशा शब्दात डॉ.चलवादी यांनी बसपची भूमिका स्पष्ट केली.
गरिबांच्या जीवनशैलीत सुधारणा होईल, अशा पद्धतीने योजनांची आखणी करावी.केवळ निवडक श्रीमंत, उद्योगपतींच्या हितासाठी निर्णय घेणे हा अयोग्य दृष्टिकोन असल्याचा सल्ला देखील बसपा ने केंद्र सरकार ला दिला आहे.दैनंदिन उपभोग्य वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे नागरिकांचे जीवन कठीण होत आहे. त्यातच उत्पन्न घटल्यामुळे लोक ‘अच्छे दिन’ येण्याची वाट पाहत आहेत, असे म्हणत त्यांनी सरकारवर उपरोधिक टोला लगावला.
सध्या देशात कोट्यवधी लोक गरिबी, महागाई, बेरोजगारीमुळे गावे सोडून शहरांत स्थलांतर करत आहेत.या काळात रेल्वेप्रवास हे त्यांच्यासाठी आवश्यक साधन आहे, परंतु भाडेवाढीमुळे तोही खर्चिक बनतो आहे. सरकारने अशा गरजू नागरिकांप्रती सहानुभूतीपूर्वक, कल्याणकारी दृष्टीकोनातून निर्णय घ्यावा,अशी मागणी सुश्री बहन मायावती जी यांनी केल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
देशातील सुमारे ९५ कोटी लोक विविध सरकारी योजनांवर अवलंबून आहेत. मात्र, अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे न झाल्याने गरीब व उपेक्षित वर्गांमध्ये असंतोष वाढतोय.
प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली गरीब, मध्यमवर्गीय नागरिकांवर आर्थिक भार टाकला जात असल्याबद्दलही सुश्री बहन मायावती जी यांनी चिंता व्यक्त केली आहे.वाहन प्रदूषण कमी करण्याच्या नावाखाली केवळ निवडक वर्गांवर लक्ष केंद्रित करून, कोट्यवधी  मेहनतकऱ्यांवर अन्याय होतो आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याची भूमिका डॉ.चलवादी यांनी मांडली.