विठ्ठल दर्शनासाठी खामगावहून ‘हरीभक्तांची’ रेल्वे पंढरपूरकडे रवाना

0
24
केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी
बुलढाणा,दि. 4  : आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सोयीसाठी आज खामगाव येथून ‘विठ्ठल दर्शन एक्सप्रेस’ ही विशेष रेल्वे मोठ्या जयघोषात आणि भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे रवाना झाली. या पहिल्या फेरित एकूण १६२९ भाविक सहभागी झाले होते. रेल्वेला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते खामगाव रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, सागर फुंडकर उपस्थित होते. या वारकऱ्यांना खामगावकरांनी ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’च्या गजरात हजारोंच्या संख्येने निरोप दिला.
स्टेशन परिसरात भक्तीरसात न्हालेली गर्दी, टाळ-मृदुंगाच्या गजरात गाणारे वारकरी, व विविध संघटनांकडून करण्यात आलेले अल्पोपहार व पाण्याचे वाटप यामुळे संपूर्ण परिसर भक्तिभावाने न्हालेला होता. गेल्या सात वर्षांपासून खामगावहून आषाढी एकादशीसाठी ही विशेष रेल्वे सेवा सुरु असून यंदाही बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, या पहिल्या फेरितून विभागाला ६ लाख ३२ हजार ३५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले असून यामध्ये सर्वसाधारण, राखीव व वातानुकूलित तिकिटांचा समावेश आहे. या पवित्र यात्रेच्या आयोजनासाठी व व्यवस्थापनासाठी स्थानिक, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांचे योगदान उल्लेखनीय होते.