34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News अधिवेशन काळात आमदारांसह त्यांच्या पीए आणि शासकीय अधिकाऱ्यांनाच विधानभवनात प्रवेश

अधिवेशन काळात आमदारांसह त्यांच्या पीए आणि शासकीय अधिकाऱ्यांनाच विधानभवनात प्रवेश

0
136

blank

विधानभवनातील राड्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला मोठा निर्णय..

मुंबई:–भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये काल विधानभवनात राडा झाला होता. या घटनेनं महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली. या मारहाणीचे तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अधिवेशन काळात विधिमंडळाचे सदस्यांसोबत विधानभवनात त्यांच्या पीए आणि शासकीय अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येईल. अन्य कोणालाही विधानभवनात प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.

विधानभवनात काल घडलेला प्रकार अतिशय वाईट होता. याआधी विधानभवनात असा प्रकार कधीही घडलेला नव्हता. विधानभवनाची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी सगळ्या सदस्यांची असल्याचं म्हणत विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी उपस्थित आमदारांचे कान टोचले. यापुढे आमदारांसह केवळ त्यांचे पीए आणि शासकीय अधिकाऱ्यांनाच विधानभवनात प्रवेश असेल, असं नार्वेकर म्हणाले. त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिलगिरी व्यक्त करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर दोन्ही आमदारांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

हे प्रकरण अत्यंत गंभीर असून विधीमंडळाची उच्च परंपरा आणि प्रतिमा राखणे हे आमदारांचे कर्तव्य आहे, असे नार्वेकर यांनी सांगितले. त्याचबरोबर या प्रकरणानंतर संसदेच्या धर्तीवर आमदार नीतीमुल्य समिती स्थापन करण्याचा विचार सुरु असून त्याबाबत 1 आठवड्यात निर्णय होईल, असे नार्वेकर यांनी सांगितले. त्याचबरोबर अधिवेशन कालावधीमध्ये विधिमंडळ परिसरात सदस्य, त्यांचे अधिकृत पीए, अधिकारी यांनाच प्रवेश दिला जाईल. अन्य प्रवेश दिले जाणार नाहीत. मंत्र्यांनी अधिवेशन कालावधीमध्ये ब्रिफिंग हे मंत्रालयात घ्यावे, असे स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. कोणत्याही अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले.

blank