31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ मुरूम उत्खनन करणार्‍या जेसीबीचा सिनेस्टाईल पाठलाग आरोपी फरार; चालक, मालकावर गुन्हा दाखल

मुरूम उत्खनन करणार्‍या जेसीबीचा सिनेस्टाईल पाठलाग आरोपी फरार; चालक, मालकावर गुन्हा दाखल

0
187

blank

गोंदिया आरएफओंची धडक कारवाई
गोंदिया, १८ जुलै –अवैधरित्या सुरू असलेले मुरूम उत्खनन करणार्‍या जेसीबीचा सिनेस्टाईल १५ ते २० किमी पाठलाग करून जेसीबी ताब्यात घेतली, मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. जेसीबीचालक दिनेश महारवाडे रा. इर्री तर जेसीबीमालक कृष्णा फुंडे रा. खातिया ता. गोंदिया असे फरार आरोपींचे नाव असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक केली जात आहे. या प्रकारावर आळा घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असताना व कारवाया होत असतानाही खनिज माफिया कारवायांना न जुमानता राजरोषपणे गौणखनिजाचे उत्खनन व वाहतूक करीत आहेत. १७ जुलै रोजी रात्री गोंदियाचे वनपरिक्षेत्राधिकारी दिलीप कौशिक हे त्यांच्या सहकार्‍यांसह गस्त घालत असताना पहाटे २.३० वाजताच्या दरम्यान तालुक्यातील भदूटोला जंगल परिसरातील वनविभागाच्या राखीव वन गट क्र. ९२५ मध्ये जेसीबीने झाडेझुडपे तोडून मुरूमाचे खोदकाम करीत असल्याचे वन पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी जेसीबीचालक व उपस्थित अन्य एकाला उत्खननासंदर्भात वन अधिकार्‍यांनी विचारणा केली. मात्र त्यांनी मुजोरी करीत उडवाउडवीचे उत्तर दिले.

.मुरूम उत्खनन करणार्‍या जेसीबीचा सिनेस्टाईल पाठलाग; गोंदिया आरएफओंची धडक कारवाई


जेसीबीजवळ जाऊन उत्खनन थांबविण्यास म्हटले असता चालकाने जेसीबी वनपरिक्षेत्राधिकारी दिलीप कौशिक यांच्या अंगावर चालविण्याचा प्रयत्न करीत शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तथापि वाहनचालक व अन्य एक व्यक्ती जेसीबी घेऊन पळून गेले. यावेळी कौशिक यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह १५ ते २० किमीपर्यंत पाठलाग केला. जेसीबी व आरोपींना पकडण्यासाठी जीवाची पर्वा न करता रात्री ३ वाजतापासून त्यांचा पाठलाग केला. दरम्यान, पहाटे ४.३० वाजता जेसीबी मशीन खातिया गावाजवळ पकडण्यात आली. यावेळी जेसीबीचालक व त्याचा सहकारी पळून जाण्यात यशस्वी झाले. जेसीबी ताब्यात घेण्यात आली आहे. चालक दिनेश महारवाडे व मालक कृष्णा फुंडे यांच्यावर वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही उपवनसंरक्षक पवन जोंग, सहायक वनसंरक्षक अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांनी केली.
कोट..
गौणखनिज माफियांच्या डंडूकेशाहिला भीक घालणार नाही, अवैध उत्खननावर अंकूश घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वीही गौणखनिज माफियांवर कारवाई केली आहे व अशा कारवाया सुरूच राहणार.
– दिलीप कौशिक
वनपरिक्षेत्राधिकारी (प्रा.) गोंदिया

blank