
भंडारा : संभाजीनगर येथून एका कारमधून डोडा (अफूच्या फळाचे टरफल) हा मादक पदार्थ कारमधून घेऊन भंडारामार्गे छत्तीसगडकडे निघालेल्या राजस्थानातील दोघांना भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलिसांनी आणि गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली.
त्यांच्याकडून ३०५ किलो डोडा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत ६१ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. अटक करण्यात आलेल्यांची नावे जयप्रकाश बिष्णोई आणि दिलीप बिष्णोई असून, ते दोघेही राजस्थानातील आहेत. एका कारमधून मोठ्या प्रमाणात डोडा घेऊन ते निघाले असल्याची टीप मिळाली. त्यावरून सकाळी ९:१५ वाजता पोलिसांनी ही कारवाई केली.या कारवाईत २० हजार रुपये प्रति किलोप्रमाणे ६१ लाख रुपये किमतीचा ३०५ किलो डोडा, सफारी कार अंदाजे २० लाख रुपये आणि दोन आयफोन, असा ८३ लाख ५० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांत एनडीपीएसच्या कलम १५, १८ आणि २९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
माल निघाला होता छत्तीसगडकडे
कारमधून हा माल घेऊन ते दोघेही छत्तीसगडकडे निघाले होते, अशी माहिती पोलिसांना दिली. हा माल कुणाला दिला जाणार होता, कुणाच्या सांगण्यावरून ही खेप निघाली होती, यातील सूत्रधार कोण, याचा शोध आता यंत्रणा घेत आहे.
या गुन्ह्यात वापरलेल्या सफारी कारची नंबर प्लेटही बनावट निघाली. पोलिसांनी तपास घेतला असता संभाजीनगर येथील वाळूज पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातून ही कार चोरी करून आणली होती, असे निष्पन्न झाले. त्याचीही नोंद पोलिसांनी घेतली आहे.
हॉटेलसमोर कार पार्क करून आरोपी झोपले
धाड घातली तेव्हा जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहापूर येथील एस.आर. ग्रँड हॉटेलसमोर ही कार पार्क करून आरोपी लॉजवर बिनधास्त झोपलेले होते. दार ठोठावून जागविल्यावर त्यांना आपण पोलिसांच्या जाळ्यात फसल्याची कल्पना आली.
नशामुक्ती अभियानाचे यश : नूरूल हसन
ही कारवाई म्हणजे भंडारा पोलिसांनी सुरू केलेल्या नशामुक्ती अभियानाचे यश असल्याची प्रतिक्रिया जिल्हा पोलिस अधीक्षक नूरूल हसन यांनी नोंदविली आहे. या घटनेतील तस्करांची साखळी मोठी असून, तिचा शोध घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.





