
गोरेगाव,दि.०१– नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) प्रकल्पाच्या अंतर्गत एक महत्त्वपूर्ण चर्चासत्राचे आयोजन पंचायत समितीच्या सभागृहात आमदार विजय रहागंडाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये शाश्वत शेती, जलसंधारण, मृदसंधारण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रातील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.या चर्चासत्रामध्ये प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांतील शेतकरी, कृषी अधिकारी, तांत्रिक सल्लागार आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांना शाश्वत शेतीतून उत्पन्नवाढ, पाण्याचा कार्यक्षम वापर, आणि जैविक शेतीचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.प्रकल्पाच्या माध्यमातून गावात जलसाठा वाढवणे, सिंचनाची उपलब्धता वाढवणे, तसेच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी विविध उपाय अंमलात आणले जात आहेत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ होऊन ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.हा प्रकल्प ही केवळ योजना नसून ग्रामीण कृषी व्यवस्थेचा पुनरुज्जीवनाचा एक व्यापक प्रयत्न आहे, असे मत यावेळी मान्यवरांनी मांडले.यावेळी प्रामुख्याने पंचायत समिती सभापती चित्ररेखाबाई चौधरी,गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दुर्गाभाऊ ठाकरे,उपसभापती रामेश्वर महारवाडे,जि.प.सदस्य प्रितीताई कतलाम,प.स.सदस्या किशोर पारधी,मनोज बोपचे,सुप्रियाताई गणवीर,उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया,तहसिलदार प्रज्ञा भोकरे,तालुका कृषी अधिकारी लालन राजपूत,देवेंद्र पारधी व शेतकरी उपस्थित होते.





