
देवरी तालुक्यात तालुकास्तरीय कार्यक्रम उत्साहात संपन्न
देवरी, दि. ०२ — तालुक्यातील वडेगाव येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या २० व्या हफ्त्याच्या निमित्ताने आज शनिवारी (दि.०२) तालुकास्तरीय थेट प्रसारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वजेगावच्या जिल्हा परिषद शाळेत आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन वडेगावच्या सरपंच अंजू बिसेन यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी देवरी पंचायत समितीचे सभापती अनिल बिसेन हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुल्लाच्या सरपंच कल्पना बागडे, तालुका कृषि अधिकारी किरण बडोले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शेतकऱ्यांना प्रोजेक्टरद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे थेट प्रसारण दाखवण्यात आले.
कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी देवेंद्र बेलेकर यांनी खरीप हंगामातील मजुरांच्या टंचाईमुळे बदलत्या पीक पद्धतीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी एसआरटी पद्धतीने भात लागवड, मका, तूर, फळबाग लागवड तसेच भात रोवणी यंत्राच्या वापराचे फायदे स्पष्ट केले.
तालुका कृषी अधिकारी किरण बडोले यांनी “दहा कोटी वृक्ष लागवड” उपक्रमांतर्गत गिरीपुष्प भात खाचराच्या बांधावर लावण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी गिरीपुष्प हे युरियाचा पर्याय असून सेंद्रिय नत्र उपलब्ध करून देणारे असल्याचे सांगितले.
पिक विमा प्रतिनिधी अमित तरजुले यांनी शेतकऱ्यांना पिक विमा योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या अडचणींचे निराकरणही करण्यात आले. विशेषतः तीन-चार शेतकऱ्यांनी पेरूची फळबाग लावण्याची तयारी दर्शवली असून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी अधिनस्त सहाय्यक कृषी अधिकारी यांनी त्यांच्या एकूण १९ मुख्यालयांमध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवले.
सभापती अनिल बसेन यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाशी सतत संपर्कात राहून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात सरपंच सौ. अंजू बिसेन यांनी पर्यावरणपूरक शेतीची गरज अधोरेखित केली. यावेळी कल्पना बागडे यांनी महिलांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करून महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे संचालन कृषी अधिकारी कमलदास सलामे यांनी केले उपस्थितांचे आभार उपकृषी अधिकारी मनोहर जमदार यांनी मानले.
दरम्यान, तालुक्यात गिरीपुष्पाचे कलम कांड्या शेतकऱ्यांना वितरित करून कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गिरीपुष्प लागवड करण्यात आली.





