
गोंदिया, दि. 7: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने बी. जे. कटरे मॉडेल इंग्लिश प्रायमरी स्कूल, पांढरी (ता. सडक-अर्जुनी) येथे सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श या विषयावर जनजागृती व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा मोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन एम. गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015, बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006, बाल कामगार अधिनियम 1986 (सुधारित 2016), तसेच बालकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणांची – बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विशेष बाल पोलिस पथक, आरोग्य विभाग यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
तसेच समुपदेशक मनिषा मोहुर्ले यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 (POCSO Act), सुरक्षित व असुरक्षित स्पर्श यांची ओळख आणि चाईल्ड हेल्पलाइन नंबर 1098 या टोल फ्री क्रमांकाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात शाळेतील पहिली ते सहावीपर्यंतच्या वर्गांतील एकूण 120 विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी शाळेचे संचालक कटरे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाल राऊत, सहाय्यक शिक्षक शेंडे सर व इतर शिक्षक यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक पटले यांनी केले तर आभार मार्गदर्शन संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) रविंद्र आर. टेंभुर्णे यांनी मानले.




