
गोंदिया,दि.26 : शिवसेना प्रणित युवासेना व विद्यार्थी सेनेच्या संयुक्तवतीने शहरातील वाहतूक व्यवस्थेला घेऊन वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक किशोर धुमाळ यांना निवेदन देण्यात आले. शहरातील वाहतूक विस्कळीत असल्यामुळे शहरवासीयांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय भरधाव वेगात वाहन चालविण्याच्या प्रकारामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. करिता शहरातील पाल चौक ते बंगाली शाळा या मार्गावर भरधाव वेगात वाहन चालविण्याचे प्रकार चालत असल्याने येथे दोन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, बाजार परिसरात एकेरी पार्कींग पुन्हा सुरू करावी तसेच सणांच्या दिवसांत बाजारात चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हासंघटक प्रशांत कोरे व युवा सेनेचे उपजिल्हा संघटक हिमांशु कुथे यांच्या नेतृत्वात निवेदन देताना अभय मानकर, हर्षल पवार, विक्की नागरीकर, अनूप माणिकपुरी, योगेश बेलगे, सौरभ शर्मा, खुशाल निंबाळकर, संदेश निंबाळकर, विनायक मेंढे, जयेश चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.