34.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता स्टॅम्प पेपरवर “कमीशन मागणारा” मुद्रांक विक्रेता एसीबीच्या जाळ्यात

स्टॅम्प पेपरवर “कमीशन मागणारा” मुद्रांक विक्रेता एसीबीच्या जाळ्यात

0
381

blank

नांदेड,दि.१३ः- परवाना प्राप्त मुद्रांक विक्रेत्यांनी त्यांना शासन देत असलेले “कमिशन” अर्थात “दलाली” कमी होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनाच “लुबाडने” सुरू केले असून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर “जबरदस्ती”ने सरळ सरळ २० रुपये अर्थात २० टक्के दलाली खाणे सुरू केले असून त्यामुळे गोरगरीब जनतेची अक्षरशः “लूटमार” केल्याचा प्रकार उघडकीस आला असून तक्रारदाराच्या तक्रारीवर नांदेड जिल्ह्यात वरचे पैसे मागणार्या मुद्रांक विक्रेत्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत.
 नांदेड जिल्ह्यातील एका तक्रारदाराने एसीबीकडे दिलेल्या तक्रारीनुसार सदरहू तक्रारकर्ता ह्याला स्टॅम्प पेपरची गरज भासली असता ते एका मुद्रांक विक्रेत्याकडून दि.८/८/२०२५ रोजी १०० रूपयाचे मुद्रांक (बॉण्ड पेपर) खरेदीसाठी गेले होते. तेव्हा ह्या मुद्रांक विक्रेत्याने तक्रारदार यांना १०० रुपयांचा मुद्रांक (स्टॅम्प पेपर) हा १२० रूपयास विकत दिला होता .तेंव्हा तक्रारदार यांनी ह्या विक्रेत्याला अधिकचे २० रूपये “कशाचे.?” अशी विचारणा केली असता त्याने तक्रारदार यांना सांगितले की तो ईतर लोकांकडून १३० रूपये घेतो परंतु तक्रारदाराकडून फक्त १२० रूपये घेतले आहेत.
त्यावेळी तक्रारदार यांना कामाची घाई असल्यामुळे त्यांनी नाईलाजास्तव १०० रूपये किंमतीचे मुद्रांक १२० रुपयास खरेदी केले. त्यानंतर तक्रारदार यांना शेतकरी आत्मा बचतगट करीता १०० रूपये दराच्या १० मुद्रांकाची (स्टॅम्प पेपरची) गरज होती. मुद्रांक विक्रेता अमृत जगताप हा प्रत्येक मुद्रांकाच्या पाठीमागे २० रूपये अतिरिक्त असे एकूण १० मुद्रांका करीता २०० रूपये घेतल्याशिवाय मुद्रांक देणार नाही व मुद्रांक विक्रेता घेत असलेले अतिरिक्त रक्कम २०० रूपये हा गैरफायदा,”जबरदस्तीने उकळलेली” रक्कम असून ती देण्याची तक्रारदार यांना मुळीच इच्छा नसल्याने,तक्रारदार यांनी दि. ११/०८/२०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड येथील कार्यालयात ह्या होणाऱ्या “लुबाडणूकी” बाबत लेखी तक्रार दिली.
ह्या तक्रारीची सत्यता पडताळणी काल दि. १२/०८/२०२५ रोजी शासकीय पंचांसमक्ष केली असता यातील मुद्रांक विक्रेता ह्याने तक्रारदार यांना १०० रू. दराचे १० मुद्रांक देण्याकरीता नियमा प्रमाणे १००० रूपयांऐवजी १२०० रूपयांची मागणी केली. नमुद रकमेमध्ये लोकसेवक असलेल्या मुद्रांक विक्रेत्याने तक्रारदार यांचेकडे २०० रूपयाच्या गैरफायद्याची मागणी करून तडजोडअंती १५० रूपये गैरफायद्याची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
प्राप्त तक्रारीनुसार ह्या लाचखोर मुद्रांक विक्रेत्याला सापळ्यात अडकवण्याकरिता दिनांक १२/०८/२०२५ रोजी माहूर तहसिल कार्यालयाच्या गेट समोर सापळा लावण्यात आला असता “लाचखोर व लालची” लोकसेवक, मुद्रांक विक्रेता यांने तक्रारदार यांना १००० रुपये किमतीचे १० मुद्रांक (स्टॅम्प पेपर) देण्याकरीता तक्रारदार यांचेकडून ११५० रूपये स्वीकारले. त्यामध्ये १०० रुपये किंमतीच्या १० मुद्रांकाची एकूण किंमत १००० रूपये व गैरफायद्याची रक्कम १५० रूपये अशी रक्कम पंचासमक्ष स्वीकारली असता त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.
आरोपी मुद्रांक विक्रेत्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे रोख ४२०० रूपये व एक  ओप्पो कंपनीचा मोबाईल असा ऐवज गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेण्यात आला आहे.अमृत श्रीरंग जगताप,वय ५६ वर्ष,व्यवसाय – मुद्रांक विक्रेता, रा.आबासाहेब पारवेकर नगर, पांडवलेणी रोड,माहूर ता.जि.नांदेड,असे ह्या परवाना प्राप्त मुद्रांक विक्रेत्याचे नाव असून त्याच्या विरूध्द पोलीस स्टेशन माहूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सदरची कारवाई सापळा व तपास अधिकारी अर्चना करपुडे, पोलीस निरीक्षक,एसीबी नांदेड यांनी व त्यांच्या सापळा पथकातील पोहेकाॅ. संतोश बच्चेवार, पोकाॅ.ईश्वर जाधव,शिवानंद रापतवार,चापोहेकाॅ.रमेश नामपल्ले यांनी केली आहे.

blank