
लाखो रुपयाचे नुकसान, नुकसान भरपाई देण्याची कटरे कुटुंबियाची मागणी
गोंदिया,दि.२५: जिल्ह्यातील आमगाव पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या जामखारी गावात सिलींडरच्या झालेल्या स्पोटात तीन घर जळून राख झाल्याची घटना आज २५ आँगस्ट रोजी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास घडली.आग लागताच आमगाव नगरपरिषदेतील अग्निशमन वाहनाला पाचारण करुन आगीवर नियंत्रण आणण्यात आले.दरम्यान आगीतून साहित्य बाहेर काढतांना दोन-तीन युवकांना हाताला जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे.सविस्तर असे की,आमगाव तालुक्यातील जामखारी येथील माजी सरपंच श्रीराम कटरे यांच्या घरी सकाळच्या सुमारास स्वयंंपाक सुरु असताना अचानक सिलिंडरचा स्पोट होऊन घराच्या छतावर असलेल्या तणसाने पेट घेतल्याने गोवर्धन कटरे, हेमंत कटरे व खिलेश्वर कटरे यांची घरे पूर्णतः जळून खाक झाली.यात अंथरूण, कपडे, अन्नधान्य, रोख रक्कम असे साहित्य भस्मसात झाले असून सुमारे पाच लाखांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने जीवितहानी टळली.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल व पोलीस पथकाने प्रयत्न केले.तहसीलदार मोनिका कांबळे व पोलीस निरीक्षक राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन तलाठ्यास पंचनामा करण्याचे निर्देश दिले.या आगीत कुटुंब उघड्यावर पडले असून शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कटरे कुटुंबाने केली आहे.





