
8 विद्यार्थी शासकीय सेवेत तर 17 विद्यार्थ्यांची व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी निवड
गोंदिया, दि.1८ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी यांच्या माध्यमातून शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या प्रयत्नांमुळे शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये वसतिगृहातील विद्यार्थ्यांची विविध शासकीय पदांवर निवड झालेली असून, 17 विद्यार्थ्यांची विशेष शिकवणी मधून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी CET प्रवेश पूर्व परीक्षेद्वारे नामांकित महाविद्यालयांमध्ये निवड झालेली आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वसतिगृहांमध्ये वाचनालय उभारण्यात आलेले असून, विविध स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच शासकीय पदांच्या भरतीविषयी जाहिराती व माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी ‘WhatsApp’ ग्रुपच्या माध्यमातून तसेच शैक्षणिक मासिके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या शैक्षणिक व मार्गदर्शक वातावरणामुळे वसतिगृहातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळत असून, त्यामधून यश संपादन करीत आहेत.
याशिवाय उच्च शिक्षणामधून पुढे चांगले करिअर घडविण्याची इच्छाशक्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी “मिशन शिखर” हा दूरदृष्टीपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना NEET, JEE, MHT-CET सारख्या प्रवेश परीक्षांची परिणामकारकरित्या तयारी करून दिली जात आहे. यासाठी NIT सारख्या नामांकित संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व मदत घेण्यात येत आहे.
आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी आश्रमशाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळवावा आणि नागरी सेवा परीक्षांमध्ये यश संपादन करावे, यासाठी विशेष उपक्रम राबविण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बन्सोड व अप्पर आयुक्त आयुषी सिंह यांनीही वेळोवेळी मार्गदर्शन करून अशा उपक्रमांना चालना दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल त्यांनी मनापासून कौतुक करीत म्हटले की, “आदिवासी विद्यार्थ्यांचे हे यश अत्यंत प्रेरणादायी आहे. आम्ही या उपक्रमांना आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व शासकीय सेवेत पोहोचण्यासाठी आवश्यक ती मदत करीत राहू”. या प्रोत्साहनामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावला असून ते आता उच्च शिक्षण व शासकीय पदांवर पोहोचण्यासाठी अधिक उत्साहाने प्रयत्नशील झाले आहेत.
सन 2024-25 मध्ये या उपक्रमाचा देवरी प्रकल्पामध्ये उल्लेखनीय परिणाम दिसून आला असून, आश्रमशाळा व वसतिगृहांतील 17 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी यशस्वीरीत्या प्रवेश मिळवला आहे. या आश्रमशाळेतील यश प्राप्त केलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयामार्फत लॅपटॉपसाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात आमदार संजय पुराम यांचे हस्ते अवंती मडावी या विद्यार्थिनीला लॅपटॉप प्रदान करून झाली आहे, ज्याचा त्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी फायदा होईल. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कामगिरीने आदिवासी समाजातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून ते उच्च शिक्षण घेण्यासाठी उत्साहाने पुढे सरकत आहेत. तसेच त्यांच्या पालकांनाही मुलांची उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याने समाधान प्राप्त होत आहे. यामधून निश्चितच त्यांच्या कुटुंबाच्या राहणीमान आणि विचारसरणीत बदल घडलेला दिसून येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांना अधिक व्यापक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये जुलैपासून मिशन शिखर उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. येत्या वर्षात या उपक्रमाचा फायदा घेऊन आणखी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होतील, असा प्रयत्न प्रकल्प कार्यालय व आश्रमशाळा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, गृहपाल, प्रकल्प कार्यालय कर्मचारी या सर्वांनी आवश्यक ते योगदान दिले.
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी निवड झालेले विद्यार्थी : अवंती मडावी B.A., L.L.B. (नॅशनल लॉ कॉलेज नागपूर)एकलव्य बोरगांव, श्रुती मरकाम M.B.B.S. (BMC Nagpur) आश्रमशाळा पुराडा, हिमेश मरई B.Sc. Agriculture आश्रमशाळा कडिकसा, घनश्याम कुंभरे B.Tech. (Civil Engineering) आश्रमशाळा कडिकसा, हिमानी पंधरे B. Sc. (Hons)Agriculture आश्रमशाळा जमाकुडो, गेनू उईके B.Sc. (Hons)Agriculture आश्रमशाळा बोरगांव, दिशा मडावी B. Sc. (Hons)Agriculture आश्रमशाळा बोरगाव, जानवी कुमेटी B. Sc. (Hons)Agriculture आश्रमशाळा बोरगाव, नेहा मरकाम B. Sc. Agriculture आश्रमशाळा जमाकुडो, पियुषकुमार गावराने Civil Engineering, समीक्षा वाढई B.Sc. Nursing वसतिगृह गोंदिया, रिंकू चर्जे Computer Engineering वसतिगृह आमगाव, मयूर राऊत B.E.(ARTIFICIAL INTELLIGENCE AND DATA SERVICE) एकलव्य बोरगाव, सुमित कुंभरे B.E. एकलव्य बोरगाव, श्रद्धा पंधरे B.Sc. Nursing एकलव्य बोरगाव, श्रद्धा काठेवाड B.Sc. Nursing एकलव्य बोरगाव, आरती पोरेटी B.Sc. Nursing एकलव्य बोरगाव,
शासकीय सेवेत निवड झालेले विद्यार्थी : जयश्री जामकाटे पोलीस कॉन्स्टेबल C.I.S.F. वसतिगृह देवरी, स्नेहा पंधरे पोलीस कॉन्स्टेबल मुंबई वसतिगृह देवरी, श्रीकांत किरसान पोलीस शिपाई S.R.P.F. वसतिगृह मोरगाव अर्जुनी, दर्शन येल्ले पोलीस शिपाई S.R.P.F. वसतिगृह गोंदिया, सागर चुलपार पोलीस कॉन्स्टेबल B.S.F. वसतिगृह गोंदिया, खेमराज सोनकुकरा पोलीस कॉन्स्टेबल सिटी पोलीस पुणे वसतिगृह देवरी, केशव गिरी पोस्टमन डाक विभाग वसतिगृह मोरगाव अर्जुनी, डॉली मडावी पोस्टमन डाक विभाग वसतिगृह गोंदिया.
| आश्रमशाळा व वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थी येणाऱ्या काळात जास्तीत जास्त शैक्षणिक पातळीवरती यशस्वी व्हावेत यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी प्रकल्प कार्यालयामार्फत करण्यात येत आहेत. हा उपक्रम फक्त विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबासाठीही नवी आशा आहे. यामुळे समाजात उच्च शिक्षणाची नवी जागरूकता निर्माण होण्यास मदत होत आहे. यशस्वी मुलांना लॅपटॉपसाठी अर्थसहाय्य हा विशेष उपक्रम राबविला जात आहे. – उमेश काशिद, प्रकल्प अधिकारी, देवरी |





