34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता तांदूळ व्यापाऱ्याची कोटीची फसवणूक;तिघांना घेतले ताब्यात, दोघे फरार

तांदूळ व्यापाऱ्याची कोटीची फसवणूक;तिघांना घेतले ताब्यात, दोघे फरार

0
288

blank

गोंदिया,दि.२५ : कमी दरात तादूळ देण्याचे आमिष देऊन राइस मिल व तांदूळ व्यापाऱ्याची एक कोटी रुपयांनी फसवणूक करून आरोपी फरार झाले. याप्रकरणी आमगाव येथील लांजी रोडवरील ‘माँ शक्ती राइस मिल’चे व्यापारी वीरेंद्रकुमार राधेश्याम लिल्हारे (४५) यांनी २४ सप्टेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात ५ जणांविरुद्ध तक्रार नोंदविली. यानंतर पोलिसांनी ३ आरोपींना ताब्यात घेतले असून दोन आरोपी फरार आहेत.
प्राप्त माहितीनुसार तांदूळ व्यापारी वीरेंद्रकुमार लिल्हारे यांची भेट आठ दिवसांपूर्वी नागपूर येथील न्यूरॉन हॉस्पिटलजवळ दीप्ती मिश्रा यांच्यासोबत झाली. त्यावेळी मिश्रा यांनी छिंदवाडा येथील रामेश्वर धुर्वे व हेमलता बैस यांची ओळख करून दिली. दोघांनी व्यापाऱ्याला फायनान्स आणि धान-तांदूळ व्यवसायात गुंतवणूक करण्याची मागणी केली. व्यापाऱ्याने फायनान्स करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे दिली. त्यानुसार मुंबईतील पत्ता देण्यात आलेल्या ठिकाणी पाठविली गेली. दीप्ती मिश्रा काही दिवसांनी आमगाव येथे लिल्हारे यांची हेमलता आणि राधेश्याम यांच्यासोबत भेट घडवून आणली. या दरम्यान, महेंद्रसिंग मल्होत्रा (४०) रा. चंडीगड नावाच्या व्यक्तीसोबत फोनवर सौदा केला गेला. कमी किमतीत १० कंटेनर तांदूळ देण्याची अट ठेवून एक कोटी रुपये नगदी घेतले. २३ सप्टेंबर रोजी मल्होत्रा आणि राहुल मल्होत्रा राइस मिलवर आले आणि पैसे घेऊन ऑटोने फरार झाले. याप्रकरणी तक्रारीवरून आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३ (५, ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला.

माल पोहोचला नाही
२३ सप्टेंबर रोजी आरोपींनी गोंदियात लिल्हारे यांना बोलावून, तांदळाचे कंटेनर पोहोचले आहेत, पैसे द्या असे सांगितले. जयस्तंभ चौक परिसरात, अप्सरा वाईन शॉप समोर लिल्हारे यांनी एका कापडाच्या पोत्यात व दोन तांदळाच्या पोत्यामध्ये ठेवलेले १ कोटी रुपये रामेश्वर धुर्वे व हेमलता बैस यांच्याकडे दिले. हे पैसे आरोपींनी एका ऑटोत बसलेल्या अनोळखी व्यक्तींना दिले. त्यातील एकाला महेंद्रसिंग मल्होत्रा असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पैसे घेतल्यानंतरही तांदळाचे कंटेनर राइस मिलमध्ये पोहोचले नाहीत. फोन संपर्क साधला असता नंबर बंद आढळला.
पोलिसांची तत्काळ कारवाई
फसवणूक झाल्यानंतर व्यापाऱ्याने रात्री शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. यानंतर पोलिसांनी राधेश्याम, हेमलता, मिश्रा, महेंद्र सिंग आणि एक अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींकडून ५०० रुपयांच्या काही बनावट जप्त केल्याची माहिती आहे. फरार आरोपी शोधण्यासाठी चमू रवाना झाल्या आहेत

blank