
माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने संघटनेत सर्वोच्च नेतृत्वात दुसऱ्या स्थानी असलेल्या भूपतीकडून शस्त्रे काढून घेण्याचे आदेश दिले. यावर भूपतीची नेमकी भूमिका काय याकडे दंडकारण्याचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे मागील ४५ वर्षांपासून संघटनेत कार्यरत असलेला माओवाद्यांचा हा नेता नेमका कुठे आहे, त्याच्यासोबत संघटनेतील किती सहकारी आहेत याविषयीचा शोध महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगण, ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील सुरक्षा यंत्रणांकडून घेतला जात आहे.
पीपल्स वॉर ग्रुप या माओवादी संघटनेची स्थापना कोंडापल्ली सीतारामय्यानी १९७५च्या सुमारास केली. या काळात त्याच्या विचारधारेकडे आकर्षित होऊन तत्कालीन आंध्र प्रदेशच्या उस्मानिया आणि काकतिया विद्यापीठातून पदवीधर झालेले अनेक युवक आकर्षित झाले. महाराष्ट्राच्या सीमेपासून शंभर किलोमीटर अंतरावरील पैदापल्ली येथील स्वातंत्र्यसंग्राम सैनिक असलेल्या एका शिक्षकाच्या घरात जन्मलेले मल्लोजुला कोटेश्वरराव उर्फ किशनजी आणि त्याचा लहान भाऊ वेणुगोपाल उर्फ भूपती हे दोघे शिक्षण पूर्ण केल्यानंतर या संघटनेत सामील झाले. नक्षल्यांच्या तत्कालीन नेत्यांनी या दोघांना तत्कालीन चंद्रपूर आणि सध्याच्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात पाठविले. भूपतीच्या मार्गदर्शनात १९८२मध्ये सिरोंचा दलम आणि अहेरी दलमची उभारणी करण्यात आली. पेरमिली आणि एटापल्ली दलमही उभे राहिले. या सर्व दलमचा मुख्य मार्गदर्शक म्हणून भूपती काम करीत होता. १९८४मध्ये कमलापुरात माओवाद्यांचे मोठे अधिवेशन झाले होते. या अधिवेशनाचे संपूर्ण नियोजन भूपतीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. याच काळात भूपतीला राज्य राखीव दलाचे जवान आणि आंध्र प्रदेश पोलिस यांनी संयुक्तपणे अटक करून सिरोंचाला आणले होते. नंतर भूपतीला चंद्रपूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. पुढे त्याची सुटका झाली.
सुटकेनंतर भूपतीने नागपूर, ठाणे, मुंबई, भिवंडी या परिसरात कामगारांच्या वस्त्यांमध्ये जाऊन नक्षल विचारधारेचा प्रचार केला. यानंतर तो गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय झाला. अहेरी दलममध्ये काम करणाऱ्या तारक्कासोबत १९८५मध्ये भूपतीने लग्न केले. गडचिरोली जिल्ह्यात माओवादी संघटना मजबूत करण्यासाठी १९९९७पर्यंत सक्रिय असलेला भूपती नंतर दंडकारण्यात सक्रिय झाला. बस्तरमधील अनेक जिल्ह्यांत फिरून त्याने संघटनेच्या प्रचारासाठी प्रयत्न केले. माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य आणि नंतर २००३मध्ये माओवाद्यांचा केंद्रीय समितीचा सदस्य म्हणून भूपतीची निवड करण्यात आली.
युद्धबंदीच्या प्रस्तावाने कोंडी
अलीकडेच भूपतीने माओवादी संघटना युद्धबंदी करीत असल्याचे सांगत शांतता चर्चेसाठी सरकारसमोर पत्रकातून प्रस्ताव ठेवला होता. एक महिन्याची मुदत मागत भविष्यात संघटना शस्र सोडणार असल्याचे संकेतही भूपतीने दिले होते. तीन दिवसांपूर्वी माओवाद्यांच्या तेलंगण राज्य समितीने हा संघटनेचा निर्णय नाही तर भूपतीचा वैयक्तिक असल्याचे सांगत त्याची कोंडी केली होती. हे पत्रक काढणारा जहाल माओवादी विकल्प हा महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत दोन दिवसांपूर्वी ठार झाला होता. या घडामोडीवर भूपतीची नेमकी भूमिका काय आहे याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.





