32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ भगवान झूलेलाल साहिबांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या अमित बघेलवर कठोर कारवाईची मागणी

भगवान झूलेलाल साहिबांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या अमित बघेलवर कठोर कारवाईची मागणी

0
139

blank

* सिंधी समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

गोंदिया,दि.०१ः सिंधी समाजाचे आराध्य देव भगवान झूलेलाल साहिब यांच्या विरोधात अमित बघेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह आणि अशोभनीय टिप्पणीच्या निषेधार्थ आज गोंदिया येथील सिंधी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली.
सिंधी समाजाने ही बाब केवळ धार्मिक भावना दुखावणारी नसून समाजाच्या श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेवर थेट प्रहार असल्याचे म्हटले.

या गंभीर प्रकाराच्या निषेधार्थ सिंधी जनरल पंचायत, गोंदिया तसेच शहरातील विविध सामाजिक संस्था, महिला मंडळे आणि युवक संघटना यांनी एकत्र येऊन कलेक्ट्रेट परिसरात एकत्रितपणे निषेध नोंदवला.समाजाच्या प्रतिनिधी मंडळाने माननीय जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन देत आरोपी अमित बघेल यांच्यावर तातडीने कठोर आणि दंडनीय कारवाई करण्याची मागणी केली.

निवेदनात नमूद करण्यात आले की, अशा प्रकारच्या अशोभनीय व धार्मिक भावना दुखावणाऱ्या टिप्पणींमुळे समाजात वैमनस्य, अशांतता आणि द्वेषाचे वातावरण निर्माण होते.भगवान झूलेलाल साहिब हे सिंधी समाजाचे आराध्य देव असून, त्यांची पूजा-अर्चना जगभरातील सिंधी समाज अत्यंत भक्तिभावाने करतो. त्यामुळे त्यांच्या विरोधात केलेली कोणतीही अपमानास्पद टिप्पणी समाजासाठी असह्य आहे.

सिंधी जनरल पंचायत आणि समाजातील मान्यवरांनी प्रशासनास मागणी केली की, आरोपीवर माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) तसेच भारतीय दंड संहिता अंतर्गत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात कोणीही धार्मिक श्रद्धांचा अपमान करण्याचे धाडस करणार नाही.समाजाने या घटनेचा तीव्र निषेध करत इशारा दिला की, जर तातडीने कारवाई करण्यात आली नाही, तर सिंधी समाज टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यास बाध्य होईल.

या प्रसंगी समाजातील अनेक वरिष्ठ नागरिक, महिला वर्ग, युवक, व्यापारी आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या कृत्याचा तीव्र निषेध करत असे म्हटले की, धर्म, समाज आणि देशाची एकता टिकवण्यासाठी अशा लोकांवर आदर्श स्वरूपात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

blank