
गोंदिया- अखिल भारतीय साहित्य परिषद न्यास, नवी दिल्ली यांच्या वतीने दि. ७ ते ९ नोव्हेंबर २०२५ ला १७ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन मध्यप्रदेशातील रीवा येथे भव्यदिव्य वातावरणात पार पडले.या अधिवेशनात अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या लोकसाहित्य केंद्रीय समितीवर ॲड. लखनसिंह कटरे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
या अधिवेशनाचे उद्घाटन भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष डा. सुशीलचंद्र त्रिवेदी ‘मधुपेश’ होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मराठीचे प्रख्यात कादंबरीकार विश्वास महिपती पाटील उपस्थित होते.
या तीन दिवसांच्या साहित्यिक महोत्सवात देशभरातील १५०० हून अधिक साहित्यिक, कवी, विचारवंत व विद्वान सहभागी झाले. विविध विषयांवरील चिंतन, चर्चा आणि राष्ट्रीय विचारांची देवाणघेवाण यामुळे हे अधिवेशन भारतीय साहित्याच्या इतिहासात एक संस्मरणीय पर्व ठरले.
समारोप सत्रात (दि. ९ नोव्हेंबर) अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या नव्या त्रैवार्षिक कार्यकारिणीची घोषणा निवर्तमान राष्ट्रीय संघटनमंत्री श्रीधर पराडकर यांनी केली. या निवडीत डा. सुशीलचंद्र त्रिवेदी ‘मधुपेश’ यांची पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली, तर इतर मान्यवरांना विविध पदांवर नियुक्ती मिळाली.
या अधिवेशनात भारतीय लोकसाहित्याच्या अध्ययन, संवर्धन आणि संकलनासाठी लोकसाहित्य केंद्रीय समितीची स्थापना करण्यात आली. या समितीवर भारतभरातून निवडलेल्या तीन सदस्यांपैकी महाराष्ट्रातून ॲड. लखनसिंह कटरे यांची निवड झाली आहे. सध्या ॲड. कटरे हे अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या विदर्भ प्रांताध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. ॲड. कटरे यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य परिषदेचे नितीन केळकर, बळीराम राठोड, विदर्भ प्रांताचे चंद्रकांत लाखे, सुनील शिनखेडे, सुनील पाडधीकर, खानदेश प्रांताचे संजीव गिरासे तसेच बैतूल (म.प्र.) येथील धर्मेंद्र खवसे आदींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.





