40 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home महाराष्ट्र कौशल्य विकासाला गती! महावितरण-रामदेवबाबा विद्यापीठ करारामुळे ‘मेक इन महाराष्ट्र’ला ऊर्जा

कौशल्य विकासाला गती! महावितरण-रामदेवबाबा विद्यापीठ करारामुळे ‘मेक इन महाराष्ट्र’ला ऊर्जा

0
32

नागपूरदि. 16 नोव्हेंबर 2025:  महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्राला अधिक बळकट आणि सक्षम करण्यासाठी महावितरणने एक दूरदृष्टीचे पाऊल टाकले आहे. महावितरण नागपूर आणि येथील नामांकित रामदेवबाबा अभिमत विद्यापीठ यांच्यात नुकताच एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार संपन्न झाला. या ‘ज्ञान-आधारित’ करारामुळे विद्युत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे व्यावसायिक कौशल्य आणि गुणवत्तेमध्ये वाढ होण्यास मदत होईल, परिणामी राज्यातील वीज ग्राहक, अभियांत्रिकी विद्यार्थी आणि महावितरण या तिन्ही घटकांना मोठा लाभ होणार आहे.

महावितरणचे संचालक (संचलन तथा प्रकल्प) सचिन तालेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार करण्यात आला. रामदेवबाबा विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. राजेश पांडे आणि महावितरणच्या वतीने नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

महाराष्ट्रातील 3.16 कोटींहून अधिक ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करणारी महावितरण ही आशियातील सर्वात मोठी वीज वितरण करणारी कंपनी आहे. कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये नेतृत्त्व क्षमता, आधुनिक व्यावसायिक कौशल्ये, व्यावसायिक बुद्धिमत्ता आणि उच्च सुरक्षा मानकांचा विकास करणे अत्यावश्यक आहे. या उद्देशासाठी, उच्च-गुणवत्तेच्या शिक्षणाची पार्श्वभूमी असलेल्या रामदेवबाबा विद्यापीठासोबत एकत्र येऊन ‘मेक इन महाराष्ट्र’च्या धर्तीवर कौशल्य विकास साधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा सामंजस्य करार प्रामुख्याने इलेक्ट्रिकल क्षेत्रातील मनुष्यबळ आणि ज्ञान वृद्धिंगत करण्यावर लक्ष केंद्रित आहे. याशिवाय या करारामुळे कर्मचाऱ्यांचे तांत्रिक ज्ञान आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढल्यामुळे वीज पुरवठ्यातील बिघाड त्वरित आणि अचूकपणे दुरुस्त होतील, ज्यामुळे ग्राहकांना अखंडित आणि उच्च गुणवत्तेचा वीज पुरवठा मिळेल, कर्मचाऱ्यांना अद्ययावत सुरक्षा मानकांचे प्रशिक्षण मिळाल्याने कामाच्या ठिकाणी अपघात कमी होतील, परिणामी वीज वितरणाची यंत्रणा अधिक सुरक्षित होईल, संशोधन व विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण झाल्याने वितरण प्रणाली अधिक स्मार्ट आणि कार्यक्षम होईल, ज्याचा फायदा थेट ग्राहकांना मिळेल, विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना महावितरणच्या प्रशिक्षण संस्थेत प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि उद्योग-आधारित प्रकल्प करण्याची संधी मिळेल. यामुळे त्यांचे सैद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष कामातील अंतर कमी होईल. ‘उद्योग-शैक्षणिक संवाद’ मुळे विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजांनुसार तयार होता येईल, ज्यामुळे त्यांची रोजगार क्षमता वाढेल. महावितरणच्या अभियंत्यांकडून विशेष व्याख्याने आणि मार्गदर्शन मिळणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऊर्जेच्या क्षेत्रातील वास्तववादी अनुभव मिळेल. विद्यापीठाच्या मदतीने कर्मचाऱ्यांच्या गुणवत्ता आणि कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी विशेष अभ्यासक्रम तयार केले जातील, ज्यामुळे मनुष्यबळाची एकूण कामगिरी सुधारेल. विद्यापीठाच्या ‘संशोधन व विकास’ संशोधन व विकास सुविधा आणि ग्रंथालयांची उपलब्धता मिळाल्याने महावितरणला तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी आणि नवनवीन उपाययोजना लागू करण्यासाठी मदत मिळेल आणि विशेष विषयांसाठी कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती आणि तज्ज्ञांची देवाणघेवाण शक्य होईल, ज्यामुळे संस्थेमध्ये उच्च पात्र मनुष्यबळ विकसित होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

हा करार स्वाक्षरी झाल्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रभावी राहणार आहे. या कराराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णपणे ज्ञान-आधारित असून, कोणत्याही पक्षावर कोणतेही आर्थिक बंधन असणार नाही. याशिवाय या करारामुळे शैक्षणिक उत्कृष्टता आणि सार्वजनिक क्षेत्रातील सेवा पुरवठा यांच्यात मजबूत समन्वय निर्माण होईल, ज्यामुळे महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्राला एक नवी दिशा मिळेल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी महावितरणचे मुख्य अभियंता (चाचणी) मनिष वाठ यांचेसह रामदेवबाबा विद्यापीठाचे अनेक विभाग प्रमुख आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व अभियंते उपस्थित होते.