
मुंबई, प्रतिनिधी : नॉर्थ अमेरिकन फिल्म असोशिएशन (NAFA)चे संस्थापक अध्यक्ष, प्रख्यात उद्योगपती, राष्ट्रीय सुवर्ण कमळ पुरस्कार विजेते तसेच ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या लोकप्रिय मराठी चित्रपटांचे नामवंत निर्माते अभिजीत घोलप यांनी आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत त्यांना कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे ७ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म फेस्टिव्हल (NAFA Film Festival 2026) चे निमंत्रण दिले.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी NAFAच्या विविध उपक्रमांचे विशेष कौतुक केले. तसेच “NAFA Film Festival 2026” मध्ये उपस्थित राहण्याचे आश्वासन देत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, अभिजीत घोलप तसेच डॉ. गौरी घोलप उपस्थित होत्या.
उत्तर अमेरिकेतील मराठी आणि भारतीय समुदायासाठी NAFA फिल्म फेस्टिव्हल हा प्रतिष्ठेचा सांस्कृतिक चित्रपट महोत्सव बनला असून दरवर्षी भारतातील अनेक मान्यवर कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वे या महोत्सवात सहभागी होतात. गतवर्षी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती.
यावर्षीच्या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे, दिग्दर्शक महेश मांजरेकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे, गीतकार गुरू ठाकूर, अभिनेत्री श्रुती मराठे, अभिनेत्री गिरिजा ओक यांच्यासह अनेक नामवंत कलाकार उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी NAFA Stream OTT या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, “परदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांसाठी असे व्यासपीठ उपलब्ध होणे ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. NAFA Stream OTT मुळे महाराष्ट्रातील चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या कलाकृती आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची मोठी संधी मिळेल. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीचा जागतिक प्रेक्षकवर्ग अधिक व्यापक होण्यास मदत होईल.”
यावेळी बोलताना NAFAचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप म्हणाले, “NAFA Film Festival हा केवळ चित्रपटांचा महोत्सव नसून भारतीय संस्कृती, मराठी अस्मिता आणि जागतिक स्तरावरील कलावंतांना जोडणारा एक सशक्त सांस्कृतिक मंच बनला आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या निमंत्रणाचा सन्मान करून उपस्थित राहण्याची सकारात्मक भूमिका दर्शवली, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. उत्तर अमेरिकेतील हजारो मराठी आणि भारतीय रसिक त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक असून NAFAचे रेड कार्पेट त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाचे वैभव निश्चितच अधिक उंचावेल.”
उत्तर अमेरिकेतील मराठी आणि भारतीय समुदायामध्ये या महोत्सवाबाबत प्रचंड उत्साह असून, यंदाचा NAFA फिल्म फेस्टिव्हल हा सांस्कृतिक, कलात्मक आणि जागतिक मराठी ऐक्याचा भव्य सोहळा ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.




