
गोंदिया 61.85 %, तिरोडा 65.62 % नगरपरिषदांमध्ये मतदान
तर सालेकसा 84.90 %, गोरेगाव 80.90%*नगरपंचायतीमध्ये मतदान
गोंदिया, दि.2 :जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा नगरपरिषद व गोरेगाव, सालेकसा नगरपंचायतीमध्ये आज मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यात एकूण 73.55% मतदान झाले असून गोंदिया मध्ये 61.85% तिरोड्यांमध्ये 65.62%, साले कशामध्ये 84.90% तर गोरेगाव मध्ये 80.90% मतदान झाले. या मतदान प्रक्रियेमध्ये स्त्री, पुरुष, तरुण, वृध्द व नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून मतदान करण्यासाठी आपला उत्साह दाखविला. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी काही मतदान केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. एकंदरीत लोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी हिरहिरीने सहभाग नोंदविला. दरम्यान या चारही नागरी संस्थातील नगराध्यक्षासह नगरसेवक असे एकूण ४६५ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद झाले.
सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ होती. गोंदिया जिल्ह्यात न.प. हिंदी पूर्व माध्यमिक शाळा मरारटोली गोंदिया, जगत महाविद्यालय गोरेगाव व जि.प.शाळा मुरुमटोला (ता.सालेकसा) येथे पिंक बुथ स्थापन करण्यात आले होते. तर श्री महावीर मारवाडी प्राथमिक शाळा गोंदिया व लिटल बर्डस् स्कुल तिरोडा येथे आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते.
जिल्ह्यात गोंदिया नगरपरिषद मतदार संख्या-124311, तिरोडा नगरपरिषद मतदार संख्या-26106 व सालेकसा नगरपंचायत मतदार संख्या-6810, गोरेगाव नगरपंचायत मतदार संख्या-8654 आहे. गोंदिया जिल्ह्यात असे एकूण 1 लाख 65 हजार 881 मतदार आहेत.
पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रमानुसार नियोजित असलेला दि.3 डिसेंबर 2025 रोजीचा मतमोजणीचा दिनांक न्यायालयाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात येत आहे आणि सदर मतमोजणी सुधारित निवडणूक कार्यक्रमांतर्गत नियोजित असलेल्या मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच दि.21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून होणार आहे.
नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीसाठी गेल्या १० ते १२ दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. प्रचार तोफा थंडावल्यानंतर प्रत्येक्ष घरी जावून उमेदवारांनी िंजकण्यासाठी परिश्रम घेतला. निवडणूक आयोगाने गोंदिया नगर परिषदेतील ३ प्रभागातील आणि तिरोडा नगर परिषदेतील एका प्रभागातील निवडणुकीला स्थगिती दिल्याने या प्रभागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली नाही. यासाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या ४ जागा वगळता नगराध्यक्ष पदासाठी चारही नागरी संस्थेत एकूण २७ उमेदवार भाग्य आजमावित आहेत. तर नगरसेवक पदासाठी ४३८ उमेदवार रिंगणात आहेत. एकंदरीत या सर्व मतदारांचे भाग्य आज ईव्हीएम बंद झाले. गोंदियात १४५ मतदान केंद्र, तिरोडा-३०, सालेकसा -१७, गोरेगाव -१७ असे एकूण २०९ केंद्रावरून मतदान प्रक्रिया पार पडली.
ईव्हीएम बंदचा फटका
प्रभाग क्रमांक २२ मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळेतील मतदान केंद्रात रूम नंबर ४ ची मशीन १२.५२ वाजता पासून बंद झाली होती. ३१० घ्या मतदाराने मतदान देताना मशीन चे बटण काम करणे बंद झाले होते. तांत्रिक दुरुस्ती नंतर ०१.३२ वाजेपासून परत मशीन सुरू झाली व मतदानाला सुरुवात झाली आहे. या शिवाय काही प्रभागात मतदान केल्यानंतर ईव्हीएमचा आवाज येत नसल्याने मतदारांमध्ये गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आले.
सालेकसा येथे सर्वाधिक मतदान
सालेकसा नगर पंचायतमध्ये नगराध्यक्ष पदासह १८ जागांसाठी निवडणूक पार पडली. यासाठी एकूण ६ हजार ८०९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दुपारी ३.३० वाजेपर्यंत एकूण ५ हजार ४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 84.90 %, टक्के मतदान झाले आहे.
मतदार याद्यातील क्रमांक जुळेना
नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकी दरम्यान सुध्दा अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ पाहयला मिळाला. अनेक मतदारांचे मतदार यादीतील क्रमांक आणि त्यांना वाटप केलेल्या मतदार चिठ्यांमधील क्रमांक जुळत नसल्याने मतदारांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यामुळे काही मतदार केंद्रावरुन मतदान करण्यासाठी आलेले मतदार सुध्दा परत गेले.
जिल्हाधिकाऱ्यांची मतदान केंद्रांना भेट
जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी मंगळवारी सकाळी शहरातील इंजिन शेड, सिव्हिल लाईन येथील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी उमेदवारांचे काही प्रतिनिधी मतदान केंद्राच्या आत फिरताना आढळले. त्यांना त्यांनी चांगलेच फटकारले. तसेच उमेदवार आणि प्रतिनिधींना मतदान केंद्राच्या परिसरापासून दूर राहण्यास सांगितले.





