35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता आमदार गायकवाडांचा मुलगा अडचणीत, बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

आमदार गायकवाडांचा मुलगा अडचणीत, बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0
30

blank

बुलढाणा-बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यातून पळवून लावण्यास मदत करणे बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी आमदारपुत्र कुणाल गायकवाड आणि त्यांचे नातेवाईक श्रीकांत गायकवाड यांच्यावर बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली आहे.
बुलढाणा शहरातील गांधी प्राथमिक शाळेमध्ये असलेल्या मतदान केंद्रावर दुसऱ्याच्या नावावर तिघांनी बोगस मतदान केलं. निवडणूक अधिकारी आणि विरोधी पक्षातील उमेदावारांनी या तिघांना पकडलं. पोलिसांनी तिघा जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला. तसेच शासकीय तंत्रनिकेतन केंद्र येथील मतदान केंद्रावर दुसऱ्याच्या नावावर मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला नागरिकांनी पकडले, त्याला पोलीस ताब्यात घेत असतानाच त्यास पळून जाण्यास मदत केली. याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा आणि या प्रभागाचे उमेदवार कुणाल गायकवाड आणि पुतण्या श्रीकांत गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय. या प्रकरणाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. यामुळं या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरु झाली होती.
कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड या दोघांवर कलम 132, 49, 351- 2-3-5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळं बुलढाण्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मंगळवारी सकाळी बुलढाण्यातील शासकीय तांत्रिक संस्थेत असलेल्या मतदान केंद्रावर काही कार्यकर्त्यांनी एका बोगस मतदाराला पकडून चोप दिला. त्याचवेळी त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. मात्र, तात्काळ आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आपल्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या मतदाराला पळवून लावण्यास मदत केली. आमदार पुत्राने पोलीस कर्मचाऱ्याचा हात धरून ठेवत या बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी राठोड यांनी याबाबत बोलताना म्हटलं की बुलढाणा शहरात शासकीय तंत्रनिकेतन येथे एक बोगस मतदार पळून जात असताना काही लोकांनी पकडले होते. पोलिसांनी तिथं पडताळणी करायला जात असताना इतर दोघांनी शासकीय कामात अडथळा केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानं गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती रवी राठोड यांनी दिली आहे. मतदान सुरु असताना गांधी विद्यालय जिजामातानगर केंद्रावर तीन बोगस मतदार असल्याबाबत तिथल्या मतदान केंद्राधिकाऱ्याकडून तक्रार प्राप्त झाली. त्यावरुन तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राठोड यांनी दिली.

blank