
गोंदिया,दि.०६ : देवरी पंचायत समिती अंतर्गत सन २०२१ ते २०२६ दरम्यान गावा-गावात मनरेगा अंतर्गत झालेल्या कामांमध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचारात पदाधिकारी व अधिकारी यांचा संगनमत आहे, असा आरोप अॅड. भुषणकुमार मस्करे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. भ्रष्टाचार संदर्भातील तक्रार मुख्यमंत्री, जिल्हाधिकारीपासून सर्वस्तरीय अधिकाऱ्यांपर्यंत करण्यात आली आहे, मात्र शासन स्तरावरही या भ्रष्टाचाराला सारवासारव केला जात आहे, असाही आरोप मस्करे यांनी केला आहे.सोबतच शासनाचे जीएसटी निधी सुध्दा मोठ्याप्रमाणात बुडविण्यात आला असून यामध्ये संबधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांचाही सहभाग असण्याची शक्यता वर्तवली आहे.जिल्हा प्रशानाने कारवाई न केल्यास उपोषण आंदोलनाचाही मार्ग स्विकारणाचा इशारा दिला.
मनरेगा अंतर्गत तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतीमध्ये रस्ता खडीकरण, पुलाचे बांधकाम, सिंचन विहिर, कम्पोस्ट टाकी, शोष खड्डे, सिमेंट रस्ता, नाली बांधकाम, गुन्हांचे गोठे असे आदी कामे करण्यात आली. मात्र या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, हे उघडपणे पहावयास मिळत आहे. एवढेच नव्हेतर कामासंदर्भात दस्ताऐवज पुरावे म्हणून हाती लागले आहेत. गुहांचे गोठे रेकार्डपुर्ण झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र प्रत्येक्षात अनेक गोठ्यांची
कामे झालीच नाही. सिंचन विहिरीचे कामे बीपीआरमध्ये पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अनेक सिंचन विहिर कागदावरच असल्याचे पहावयास मिळत आहे. वडेगाव ग्रामपंचायत येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. रस्ता खडीकरणाचा अंदाज पत्रकानुसार कामे यात आली नाही. पुलाचे बांधकाम देखील अंदाज पत्रकानुसार झाले नाही. ५५ ग्रामपंचायती मध्ये मनरेगा अंतर्गत २०२२-२३ ते २०२५-२६ या काळात शासनाला एकही रुपायाचे रॉयल्टी भरण्यात आली नाही. शिवायटीडीएस, जीएसटी कपात करण्यात आली नाही. या माध्यमातून शासनाच्या तिजोरीला चुना लावण्यात आला आहे. कम्पोस्ट टाकी बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारा झाला आहे. हा प्रकार तत्कालीन मुकाअ अनिल पाटील यांच्या निदर्शनास आले होते, त्यामुळे त्यांनी वसुलीचे आदशेही काढले. परंतु अद्यापर्यंत त्या संबंधितांकडून अपहाराची निधी वसूल करण्यात आली नाही, असा आरोप अॅड. मस्करे यांनी आयोजित पत्र परिषदेत केले आहे.
या संदर्भात माहिती देतांना अॅड. मस्करे म्हणाले, देवरी तालुक्यात झालेल्या कोट्यावधीच्या भ्रष्टाचारी तक्रार मुख्यमंत्री फडणविस, मंत्री भरत गोगावले, जिल्हाधिकारी नायर, उपजिल्हाधिकारी खनिज, जि.प. चे मुकाअ, खंडविकास अधिकारी, आयुक्त (मनरेगा), आयुक्त (जीएसटी) यांच्यासह सर्वच कार्यालयात करण्यात आली आहे, असे असतांनाही शासनाकडून अद्यापपर्यंत भ्रष्टाचाराची दखल घेण्यात आली नाही. भ्रष्टाचारी यंत्रणेसह पदाधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी अधिकारी ठोस भूमिका घेतांना दिसून येत नाही, असाही आरोप त्यांनी केला. आगामी नागपूर येथील अधिवेशनात अनेक आमदारांच्या वतीने देवरी येथील भ्रष्टाचार विधानसभेच्या पटलावर मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. देवरी येथील भ्रष्टाचाराची कारवाई करण्यात यावी व त्यात सहभागी अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आपण केली असल्याचेही त्यांनी दिली.





