30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ गोंदिया तालुक्यातील पांजरा गाव परिसरात निम्नवयीन सारस पक्ष्याचा मृत्यू

गोंदिया तालुक्यातील पांजरा गाव परिसरात निम्नवयीन सारस पक्ष्याचा मृत्यू

0
171

blank

*विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने की विषबाधेने– कारणांचा तपास सुर
*
गोंदिया -तालुक्यातील पांजरा गावातील शेत परिसरात एका निम्नवयीन (अंदाजे ३–४ महिने वयाच्या) सारस पक्ष्याचा मृत्यू झाल्याची घटना नोंदविण्यात आली आहे. सदर मृत्यू विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने की विषबाधेमुळे झाला असावा, अशी शक्यता असून याबाबत सखोल तपास सुरू आहे.
धोकाग्रस्त/संकटग्रस्त असलेले सारस पक्षी महाराष्ट्रात प्रामुख्याने गोंदिया जिल्हा व लगतच्या भंडारा जिल्ह्यात आढळतात. विशेष म्हणजे, सारस पक्ष्यांची घरटी व नियमित प्रजनन करणाऱ्या जोड्या केवळ गोंदिया जिल्ह्यात आढळतात. पावसाळ्यात हे पक्षी धानशेतात घरटी करून अंडी घालतात व सप्टेंबर–ऑक्टोबर महिन्यांत बच्चे घेऊन शेत परिसरात विचरण करतात.
सन २०२५ च्या विणी हंगामात जन्माला आलेल्या बच्च्यांपैकी कामठा–जिलमिली–पांझरा परिसरातील हा बच्चा एका शेतकऱ्याला अस्वस्थ अवस्थेत चालत येताना दिसला. काही वेळातच त्या बच्च्याचा तडफडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभाग व सेवा संस्थेला कळविण्यात आले. त्यानंतर पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचून मोक्का पंचनामा करून प्राथमिक शहानिशा करण्यात आली.
मृत सारस पक्ष्यास पुढील तपासासाठी गोंदिया येथील पोलिक्लिनिकमध्ये शवविच्छेदन व प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया उप वनसंरक्षक पवन जोंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.
घटनास्थळी मानद वन्यजीव रक्षक व सेवा संस्थेचे सावन बहेकार, वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक, बी.एन.एच.एस. संस्थेचे मुकुंद धुर्वे, सेवा संस्थेचे अभिजीत परिहार, कन्हैया उदापुरे, वनरक्षक मुकेश मेहर तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते. शवविच्छेदन व तपासणीची कार्यवाही पशुवैद्यकीय अधिकारी देवेंद्र कटरे व रहांगडाले यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
शवविच्छेदन व प्रयोगशाळा तपासणीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सदर सारस पक्ष्याचा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने झाला की विषबाधेमुळे, हे निश्चितपणे स्पष्ट होईल.
— वन विभाग व सेवा संस्था, गोंदिया

blank