37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ गोंदिया–बालाघाट महामार्गावरील संथ,धोकादायक कामाविरोधात वृक्षधरा फाउंडेशनचा आवाज

गोंदिया–बालाघाट महामार्गावरील संथ,धोकादायक कामाविरोधात वृक्षधरा फाउंडेशनचा आवाज

0
79

blank

गोंदिया :गोंदिया–बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले अत्यंत संथ, निष्काळजी व धोकादायक बांधकाम हे सध्या नागरिकांच्या जीवितास थेट धोका ठरत असल्याचे चित्र आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वृक्षधरा फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी  प्रजित नायर तसेच गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार  विनोद अग्रवाल यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी खोल उत्खनन करून काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले आहे. रस्त्याच्या कडेला संरक्षक बॅरिकेड्स, चेतावणी फलक, लाईट्स किंवा पर्यायी मार्गांची योग्य व्यवस्था नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

वृक्षधरा फाउंडेशनने स्पष्ट केले की, महामार्गाचे काम वर्षानुवर्षे अपूर्ण ठेवणे हे केवळ निष्काळजीपणाचेच नव्हे, तर नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे आहे. संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी, अपघात, वेळेची नासाडी आणि आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे गोंदिया–बालाघाट महामार्गाचे उर्वरित काम निश्चित कालमर्यादेत, दर्जेदार साहित्य वापरून आणि सुरक्षितता नियमांचे पालन करून तातडीने पूर्ण करण्यात यावे.महामार्गावर काही ठिकाणी नुकतेच झालेले काम निकृष्ट दर्जाचे असून, अल्प कालावधीतच रस्ता उखडणे, खड्डे पडणे व बाजूची माती ढासळणे अशी स्थिती दिसून येत आहे. यामुळे भविष्यात मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच या संपूर्ण प्रकल्पाची स्वतंत्र व तांत्रिक चौकशी करून जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

वृक्षधरा फाउंडेशनने सर्वात गंभीर प्रश्न उपस्थित केला की, जर महामार्ग बांधण्यासाठी १०० वर्षांहून अधिक जुनी झाडे तोडली जात असतील, तर त्याची भरपाई कोण करणार?देशात एकीकडे वेगाने रस्ते बांधले जात आहेत, मात्र दुसरीकडे त्याच्या दुप्पट वेगाने वृक्षतोड होत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे वृक्षारोपण हे प्रशासनाकडून केवळ फाईलवर दाखवले जात असून, प्रत्यक्षात जमिनीवर झाडे दिसत नाहीत.त्यामुळे तोडण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी किमान ८ फूट उंचीची देशी झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे आणि ती झाडे प्रत्यक्ष जिवंत राहतील याची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विभागाला तातडीने चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच आमदार विनोद अग्रवाल यांनीही या विषयात प्रशासनाशी समन्वय साधून योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.यावेळी वृक्षधरा फाउंडेशनचे पदाधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank