
“बोंडगाव देवी येथे ५ दिवसीय जिल्हास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ”
अर्जुनी-मोर.गोंदिया जिल्ह्यातील बोंडगाव देवी येथे आयोजित पाच दिवसीय जिल्हास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. युवकांमध्ये क्रीडा, कला व सांस्कृतिक मूल्यांची जोपासना व्हावी, ग्रामीण भागातील सुप्त प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळावे तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
*उद्घाटनप्रसंगी अर्जुनी-मोरगाव विधानसभा आमदार राजकुमार बडोले यांनी आपल्या भाषणात* सांगितले की, “अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव हा केवळ स्पर्धांचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प आहे. आगामी काळात या महोत्सवाची व्याप्ती केवळ जिल्ह्यापुरती न ठेवता विभागीय व राज्यस्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये मिळणाऱ्या प्रमाणपत्रांना गुणांकन मिळावे, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच अनेक नामवंत वैज्ञानिकांचे दाखले देत जि.प.च्या शाळांमधून प्रतिभावंत विद्यार्थी घडावे.असे आवाहन ही आमदार बडोले यांनी केले.
*आमगाव-देवरी विधानसभा आमदार संजय पुराम यांनी आपल्या मनोगतात* जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी शिक्षकांनी ग्राऊंड पातळीवर उतरून आपल्या शाळांच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे,” असे मत व्यक्त करुन या शाळांमधुन उच्चपदस्थ अधिकारी कसे बनतील यासाठी शिक्षकांनी अधिक क्रियाशील होण्याचे आवाहन केले,
*जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी* विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत सांगितले की, “शिक्षणासोबतच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांचा विकास घडवून आणण्यासाठी प्रशासन नेहमीच प्रयत्नशील राहील.”
*जिल्हा परिषद गोंदियाचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व क्रीडा सभापती सुरेश हर्षे यांनी* आपल्या भाषणात जिल्ह्यातील सर्व शिक्षकवृंदांना आवाहन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना आचार्य चाणक्यासारखे घडवण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत.”जि.प.गोंदिया ही नेहमीच जि.प.हायस्कूल व प्राथमिक शाळांचा स्तर उंचावण्यासाठी कटीबध्द आहे.
*अध्यक्षीय भाषणातून गोंदिया जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी* महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.सोबतच जिल्हा परिषदाच्या शाळांचे अस्तित्व टिकवुन रहावे.या शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळावे असे आपले प्रयत्न आहेत.शिक्षकांची कमतरता भरुन काढण्यासाठी जिल्ह्यात तासिका शिक्षकांसह ५५० चे जवळपास शिक्षण सेवकांची नेमणुक करण्यात आल्याचे सांगुन भेंडारकर पुढे म्हणाले की,
या पाच दिवसीय महोत्सवात कबड्डी, खो-खो, बुद्धिबळ, प्रश्नमंजुषा आदी विविध क्रीडा स्पर्धांसह लोकनृत्य, लोकगीत, नाट्यप्रयोग, एकांकिका, संगीत यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून मोठ्या संख्येने खेळाडू व कलाकारांनी सहभाग नोंदविला असून हा उत्स्फूर्त प्रतिसाद महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना संधी देणे, महिलांचा सहभाग वाढविणे तसेच स्थानिक लोक केलेला चालना देणे यावर विशेष भर देण्यात आला आहे. बोंडगाव देवी येथे सुरू झालेला हा अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जिल्ह्यात क्रीडा व संस्कृतीच्या क्षेत्रात नवे पर्व घडवेल असा विश्वासही गोंदिया जिल्हा परिषद चे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केला.
उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते थोर महापुरुष व भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राजकुमार बडोले (आमदार, अर्जुनी-मोरगाव), संजय पुराम (आमदार, आमगाव-देवरी), लायकराम भेंडारकर (अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया), एम. मुरुगानंथम (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया), सुरेश हर्षे, पौर्णिमा ढेंगे, रजनी कुंभरे, डॉ. लक्ष्मण भगत, दीपा चंद्रिकापुरे, आम्रपाली डोंगरवार, पंकज रहांगडाले, उषाताई मेंढे, इंजि. यशवंत गणवीर, चत्रभुज बिसेन, हनुवंत वट्टी, शैलेश नंदेश्वर, भुमेश्वरी बघेले, निशा जनबंधु, कविता कापगते, जयश्री देशमुख, कविता रंगारी, प्रवीण पटले, डॉ. भुमेश्वर पटले, छबुताई उके, गीताताई लिल्हारे, चंद्रकला डोंगरवार, चंद्रशेखर ठवरे, शामकांत नेवारे, राधिका धरमगुळे यांच्यासह जिल्हा, तालुका व ग्रामपातळीवरील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, बचतगटातील महिला, ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महोत्सवाचे सूत्रसंचालन नमिता लोथे (लंजे) यांनी केले, प्रास्ताविक अश्विन डोंगरे (शिक्षणाधिकारी – प्राथमिक, गोंदिया) यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख भानारकर यांनी केले. उद्घाटनप्रसंगी सर्व उपस्थितांनी शपथ घेऊन उद्घाटनीय कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





