27.1 C
Gondiā
Monday, July 20, 2026
Home क्रीडा गुरिंदरवीरने रचला नवा राष्ट्रीय विक्रम, फेडरेशन कपमध्ये सुवर्णपदक

गुरिंदरवीरने रचला नवा राष्ट्रीय विक्रम, फेडरेशन कपमध्ये सुवर्णपदक

0
41
रांची,दि.२५ मे: रांची येथे पार पडलेल्या फेडरेशन कप अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय धावपटूंनी वेगाची नवी परिभाषाच लिहिली. पंजाबच्या गुरिंदरवीर सिंगने पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत केवळ सुवर्णपदक जिंकले नाही, तर भारतीय अॅथलेटिक्सच्या इतिहासात अभूतपूर्व असा विक्रम नोंदवत देशातील सर्वात वेगवान धावपटू बनण्याचा मान पटकावला.
शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत गुरिंदरवीरने १०.०९ सेकंदांची वादळी धाव घेत ‘१०.१० सेकंद’ ही भारतीय स्प्रिंटमधील ऐतिहासिक मर्यादा प्रथमच पार केली. याआधी भारतातील कोणत्याही धावपटूला हा टप्पा गाठता आला नव्हता. त्यामुळे रांचीच्या ट्रॅकवर भारतीय अॅथलेटिक्ससाठी एक नवे पर्व सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.
या स्पर्धेत ओडिशाचा अनिमेश कुजूरनेही शानदार कामगिरी करत १०.२० सेकंदांची वेळ नोंदवली आणि रौप्यपदक पटकावले. तर प्रणव प्रमोदने १०.२९ सेकंदांसह तिसरे स्थान मिळवले.
विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत गुरिंदरवीर आणि अनिमेश यांच्यात राष्ट्रीय विक्रमासाठी अक्षरशः चुरशीची लढत पाहायला मिळाली. २२ मे रोजी उपांत्य फेरीत गुरिंदरवीरने १०.१७ सेकंदांची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केला. पण काही मिनिटांतच अनिमेशने १०.१५ सेकंदांची धाव घेत तो विक्रम मोडीत काढला.
मात्र अंतिम फेरीत गुरिंदरवीरने जोरदार पुनरागमन करत सर्वांनाच मागे टाकले. १०.०९ सेकंदांची ऐतिहासिक वेळ नोंदवत त्याने राष्ट्रीय विक्रम पुन्हा आपल्या नावे केला आणि आगामी राष्ट्रकुल तसेच आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.