40.1 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home गुन्हेवार्ता बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवणाऱ्या दोन शिक्षकांसह चौघे अटकेत

बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवणाऱ्या दोन शिक्षकांसह चौघे अटकेत

0
83

अहिल्यानगर- जिल्ह्यात  जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवून त्याच्या आधारे शासकीय नोकऱ्या मिळवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी (१ जानेवारी) सायंकाळी चौघांना अटक केली आहे. यामध्ये दोन शिक्षक, एका तहसील कार्यालयातील लिपिक आणि शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचा संशय असलेला आणखी एक व्यक्ती यांचा समावेश आहे.अटक करण्यात आलेल्यांमध्ये गदेवाडी (ता. शेवगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक भारत भागीनाथ फुंदे (वय ३४, रा. भुते टाकळी, ता. पाथर्डी), पुणे महानगरपालिकेच्या मुंढवा शाळेतील शिक्षक देवीदास प्रकाश बोरुडे (वय ३५, रा. तनपुरवाडी, ता. पाथर्डी) आणि मंगळूरपीर (जि. वाशिम) तहसील कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत नागनाथ जगन्नाथ गर्जे (वय ३४, रा. भगवाननगर, पाथर्डी) यांचा समावेश आहे. यांच्यासोबतच खंडेराव ज्ञानोबा फुंदे (वय ३२, रा. भुते टाकळी, ता. पाथर्डी) यालाही अटक करण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालयातील संगनमत उघड,गुन्हा दाखल, आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास

चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता आणि रुग्णालयाच्या अधिकृत नोंदींशिवाय थेट ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तयार करण्यात आली. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने अंतर्गत चौकशी केल्यानंतर हा गंभीर गैरप्रकार उघडकीस आला.या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश उगले तपास करत आहेत.

तपासादरम्यान मृत्यू 

दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित जिल्हा रुग्णालयातील एका संशयित कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तसेच या गुन्ह्यातील तिघांनी यापूर्वी अटकपूर्व जामीन मिळवला होता. गुरुवारी अटक करण्यात आलेल्या चौघांना आज (शुक्रवारी) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आणखी मोठ्या गैरप्रकाराची शक्यता

बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकऱ्या मिळवल्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर नोकरदार वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासातून अशाच पद्धतीने आणखी काही व्यक्तींनी शासकीय सेवेत प्रवेश मिळवला असल्याचे संकेत मिळत असून, या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर अंकुश बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.