
तीन खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
भंडारा,दि.12: खो-खो असोसिएशन, भंडारा यांच्यावतीने आयोजित खो-खो महासंग्राम स्पर्धेत पंचायत समिती मोहाडी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, निलज (खुर्द) येथील मुलींनी अत्यंत उत्कृष्ट व शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वेग, चपळता, सांघिक समन्वय आणि रणनीतीच्या जोरावर या छोट्याशा गावातील खेळाडूंनी मोठ्या शाळांना कडवी टक्कर देत स्पर्धेत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
या उल्लेखनीय कामगिरीतून कु. अनिशा बोन्द्रे, कु. आदिती कुकडे व कु. माही पिंगरे या तीन गुणवान खेळाडूंची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली असून त्या आता भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ग्रामीण भागातून पुढे येऊन राज्यपातळीवर जिल्ह्याचे नाव उज्वल करणाऱ्या या खेळाडूंच्या निवडीमुळे निलज (खुर्द) गावात आनंदाचे वातावरण आहे.
या यशात संपूर्ण संघाचा मोलाचा वाटा असून संघामध्ये कु. आराध्या भोयर, आस्था भोयर, साक्षी पंचबुधे, रागिणी मोहतुरे, अनुष्का बोन्द्रे, स्वरा कुकडे, विधी पिंगरे, समृद्धी हिंगे, अश्लेषा भोयर, उन्नती मोहतुरे व पूजा तितीरमारे यांचा समावेश होता. सर्व खेळाडूंनी एकजुटीने, शिस्तबद्ध खेळत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
या यशामागे क्रीडा प्रशिक्षक शोभाराम तितीरमारे व डेव्हिड आगाशे यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले. तसेच श्रीकृष्ण भोयर,अरुण भोयर,सीमाताई मोहतुरे आणि मुख्याध्यापक श्री पवार यांनी खेळाडूंना वेळोवेळी प्रोत्साहन देत मनोबल उंचावले.छोट्या गावातील मुलींनी दाखवलेली ही जिद्द आणि आत्मविश्वास आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





